कळंबमधील ऋषिकेशच्या पेटंटला मान्यता
मंचर (प्रतिनिधी) – अवघ्या तीनच सेकंदात डिझेल आणि पेट्रोलची शुद्धता पडताळणीचे पेटंट विकसित केले आहे. ही किमया साकराली आहे, कळंब (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश कानडे याने. इलेक्ट्रो मॅग्नेटिक व्हेव्जच्या सहाय्याने (विद्युत चुंबकीय लाटा) ही पडताळणी करता येणार आहे. त्याच्या या कार्याची दखल अमेरिकन उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तसेच भारतीय अधिकाऱ्यांनी घेत कौतुक केले आहे.
संशोधनाबाबतचे वैयक्तिक भारतीय पेटंट त्याला सप्टेंबर 2018मध्ये मिळाले व अमेरिकन वैयक्तिक पेटंट 23 जून 2020 रोजी मिळाले. या पेटंटमुळे डिझेल किंवा पेटोल शुद्ध आहे की, अशुद्ध हे कुठल्याही वाहनांमध्ये भरण्यापूर्वी तपासणी करता येते. ऋषिकेश कानडे यास कुटुंबामधूनच शिक्षणाचे बाळकडू व्यवस्थित मिळाले आहे. त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील बिशप स्कूल येथून केले. तर बारावीपर्यंतचे शिक्षण कलमाडी हायस्कूलमधून केले. तर कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयातून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. त्याने अनेक राष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ऋषिकेश सध्या बंगळुरू येथील कंपनीत वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. तसेच अमेरिकेतील टेक्सास कंपनीनेही त्याची तज्ज्ञ सल्लागार म्हणून समितीवर निवड केलेली आहे. ऋषिकेश हा पुणे येथे कृषी विभागात कार्यरत असलेले कृषी उपसंचालक दिनकर कानडे यांचा मुलगा आणि शिक्षक बाळासाहेब कानडे यांचा पुतण्या आहे.
भारताने 2018मध्ये दिले पेटंट
< ऋषिकेशने महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षांत असताना जानेवारी 2015 मध्ये पहिले पेटंट मान्यतेसाठी भारतात सादर केले. या पेटंटमुळे इंधनाची शुद्धता आपल्याला तीन सेकंदातच कळते. या संशोधनाबाबत वैयक्तिक भारतीय पेटंट त्याला सप्टेंबर 2018 मध्ये मिळाले होते. त्याला आता अमेरिकने वैयक्तिक पेटंट म्हणून 23 जून 2020 रोजी मान्यता दिली आहे.