नवी दिल्ली : आकाशातून पडणारा पाऊस, बर्फवृष्टी तुम्ही पाहिली असेल एवढंच काय पण पैशांचा पाऊस देखील झालेला आपण ऐकलं असेलच… पण तुम्ही कधी माशांचा पाऊस पाहिला आहे का? नसेल तर ही बातमी नक्की वाचा…
उत्तर प्रदेशच्या भदोहीमध्ये काल असा प्रकार घडला. जोरदार वारा सुटला. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासोबत मासे उडून आले. त्यानंतर जमिनीवर माशांचा पाऊस पडू लागला. हा प्रकार पाहून ग्रामस्थ घाबरले आणि काही अनुचित घडत असल्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली. दरम्यान, आकाशातून माशांचा पाऊस सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना सामान्य नसल्याचे हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. वादळी वारे सुटल्यावर आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यावर अशा घटना घडतात, असे काही स्थानिकांचे म्हणणे आहे.
भदोहीमधील कंधिया फाटकाजवळ असलेल्या यादव वस्तीच्या शेजारच्या भागात सोमवारी पावसासोबत मासेही जमिनीवर पडले. हे दृश्य पाहणारे हैराण झाले. माशांचा पाऊस पडत असल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. काहींच्या छतांवर मासे पडले.
काहींच्या अंगणात माशांचा पाऊस पडला. त्यामुळे ग्रामस्थांची एकच धावाधाव झाली. परिसरात पडलेल्या माशांचे एकूण वजन ५० किलो भरले. हे मासे विषारी असतील अशी भीती अनेकांना वाटली. त्यामुळे काहीतरी विपरित घडेल या भीतीने ग्रामस्थांनी ते तलाव आणि खड्ड्यांमध्ये फेकले.