पुणे – शहरात मागील चोवीस तासांत 4 हजार 206 नवीन करोनाबाधित आढळले. तर, तब्बल 4 हजार 895 जणांना डिस्चार्ज मिळाल्याचे दिलासादायक चित्र अनुभवायला मिळाले, तर पुण्यातील 46 रुग्णांसह 66 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पुण्यामध्ये संचारबंदी आणि जमावबंदी जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी दररोज पाच हजारांच्या पुढे आढळणारी बाधितांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली तर त्याचवेळी डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा सुमारे 700 ने अधिक असल्याने काहीसे समाधानकारक चित्र अनुभवायला मिळाले आहे. शहरातील आतापर्यंतची बाधितांची संख्या 3 लाख 44 हजार 29 झाली आहे. त्यापैकी 2 लाख 84 हजार 801 रुग्ण बरेही झाले आहेत. तर आजपर्यंत 5 हजार 902 जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरात सध्या 53 हजार 326 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी पाच हजारांहून अधिक रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत, तर अधिक गंभीर असलेल्यांची संख्या 1 हजार 158 पर्यंत वाढली आहे. मागील चोवीस तासांत 21 हजार 325 संशयितांची करोना टेस्ट करण्यात आली आहे. अतिदक्षता आणि ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय, जवळपास 65 ते 70 टक्के बाधित त्यांच्या घरीच विलगीकरणात उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
ऑक्सिजनसाठी “दमछाक’
अत्यवस्थ आणि गंभीर करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यायाने त्यांच्यासाठी ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. तो पुरवण्याचे आव्हानदेखील प्रशासनापुढे असून, ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी रोजच्या रोज प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या उद्योगांसाठी या वायूचा पुरवठा पूर्ण बंद करण्यात आला आहे.