खासगी रुग्णालयांतील संबंधित विभागाचा ढिला कारभार चव्हाट्यावर
विवेकानंद काटमोरे
हडपसर – शहरात करोना बाधित एकाच व्यक्तीचे, एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेले “एचआरसीटी’चे दोन रिपोर्ट वेगवेगळे आले आहेत. यामुळे रुग्णालयांतील संबंधित विभागाचा ढिला कारभार समोर आला आहे. खासगी रुग्णालयांतील लॅबमधून घेण्यात येत असलेल्या कोविड “एचआरसीटी’ टेस्टबाबत देखील साशंकता निर्माण होत आहे.
शेवाळेवाडी येथील एका 40 वर्षाच्या व्यक्तीला करोनाची काही लक्षणे दिसू लागली. त्यामुळे त्यांनी लोणीकाळभोर येथील एका खासगी रुग्णालयात तपासणी करून घेतली. त्यानतंर दुपारी 02:45 वाजता पॉझिटिव्ह आणि एचआरसीटी 25 पैकी13 असा सीटी स्कोअर असलेला रिपोर्ट आला, त्यांनी तो रिपोर्ट पाहिला व आपल्याला तसा एवढा त्रास होत नसल्याचे लक्षात आले.
तरीही एवढा स्कोअर कसा काय? याबाबत मनात शंका आल्याने त्याच दिवशी त्या व्यक्तीने संध्याकाळी मांजरी स्टड फार्म येथील एका खासगी रुग्णालयात पुन्हा एचआरसीटी करून घेतले, तेव्हा रात्री 09:00च्या दरम्यान पॉझिटिव्ह आणि 25 पैकी केवळ 6 स्कोअर असलेला रिपोर्ट आला.
दरम्यान, ही एकच व्यक्ती एकाच दिवशी काही तासांच्या फरकाने तीच तपासणी करून घेतल्यानंतर एवढा मोठा फरक असलेले रिपोर्ट आल्यामुळे संपूर्ण यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. अद्यावत यंत्रणा व तंत्रज्ञान याचा दावा करणाऱ्या या दोन्ही खासगी रुग्णालयात काही तासाच्या काळातच वेगवेगळे रिपोर्ट कसे येतात? याबाबत शंका निर्माण होत आहे.
“एचआरसीटी’चे एवढे गोंधळ झाल्यानंतर या रिपोर्टने चक्रावून न जाता ती व्यक्ती डॉक्टरच्या सल्ल्याने घरीच क्वॉरंटाइन झाली. फारशी लक्षणे नसल्याने, त्यांनी औषधोपचार सुरू केले. आता, ही व्यक्ती ठणठणीत झाली आहे.
कदाचित 13 सिटी स्कोअर गृहित धरून उपचार सुरू केले असते, तर त्यांना एखाद्या रुग्णालयात दाखल होऊन कदाचित ऑक्सिजन, रेमडेसिविर असे उपचार सुरू करण्यात आले असते, नको असतानाचे उपचार झाल्याने कदाचित याचा विपरित परिणामही झाला असता. त्यामुळे रुग्णांची अथवा त्यांच्या नातवाईकांनी सतर्क राहावे, असाच धडा यातून मिळत असल्याचे बोलले जात आहे.
रेडिओलॉजिस्ट म्हणतात…
या दोन्हीं खासगी रुग्णालयांतील संबंधित रेडिओलॉजिस्ट सल्लागार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “फुफ्फुसांची तपासणी करताना त्याचा किती भाग वापरला जातो यावरून साधारणपणे सारासार असा स्कोअर दिला जातो. त्यात जास्तीत जास्त खराब आणि कमीत कमी खराब भागाचा विचार केला जातो. तपासणी पद्धत एकच आहे. एवढ्या गोष्टीवर दोन्हीं सल्लागार यांचे एकमत बोलण्यातून लक्षात आले. परंतु, एकदम काही तासांत एवढा फरक कसा पडू शकतो? याशिवाय कोविड उपचारात या स्कोअरचे काम केवळ गाइडलाइन म्हणून होते, असे एकाने सांगितले. तर तसा या स्कोअर आणि रुग्णाच्या उपचाराचा फारसा संबंध नसल्याचे दुसऱ्या सल्लागारांनी सांगितले. त्यामुळे या पुढील काळात नागरिकांनी या बाबी समजून घेणे गरजेचे आहे याशिवाय जर डबल चाचण्या सर्वांनी केल्या, तर जवळ जवळ
40 टक्के रिपोर्ट संभ्रमात येऊ शकतात. त्यामुळे योग्य काळजी घेत योग्य ठिकाणीच तज्ञांच्या सल्ल्यानेच तपासणी करून घ्याव्यात, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.