आरोग्य विभागात 54 संवर्गांसाठी पदभरती
पुणे – राज्यात आरोग्य विभागातील 54 संवर्गांची एकूण 3 हजार 277 पदांसाठी ऑफलाइन लेखी परीक्षा रविवारी (दि.28) घेण्यात येत आहे. करोना परिस्थितीत परीक्षा होत असल्यामुळे प्रशासनाला आरोग्य भरतीबाबत सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य सेवेचे संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केले आहे.
गेल्याच आठवड्यात या परीक्षेसाठी उमदेवारांनी हॉलतिकीट डाऊनलोड केले. त्यात अनेक उमेदवारांना दूरच्या अंतरावरील परीक्षा केंद्र मिळाले होते. त्याच पद्धतीने दोन पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज केलेल्यांना एकाच दिवशी व एकाच वेळेस परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याचे उघड झाले. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी होती. या पदभरतीत नियोजनाचा अभाव असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी आरोग्य विभागास निदर्शनास आणून दिली. त्याबाबत त्वरित पाऊले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. त्यास स्पष्टीकरण देताना आरोग्य विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली.
ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार होती. परंतु, शासनाने ही परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा सकाळ व दुपार असा दोन सत्रांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 4 लाख 25 हजार अर्ज आले आहेत. प्रत्येक संवर्गासाठी वेगळी परीक्षा घेतल्यास त्यास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. या सर्व बाबींचा विचार करता व करोना उपाययोजनांसाठी आरोग्य विभागामध्ये मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
काही जिल्ह्यांमध्ये उपलब्ध बैठक क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे त्या उमेदवारांना अन्य जिल्ह्यांत परीक्षेस बसण्यास हॉल तिकीट दिली आहे. करोनामुळे व्यक्तीमध्ये अंतर राखणे आवश्यक असल्याने उमेदवारांची बैठक क्षमतेप्रमाणात जागा उपलब्ध नसल्याने अन्य जिल्ह्यांत बैठक व्यवस्था करावी लागली. तसेच उमेदवारांना जवळच्या अंतरावरील परीक्षा केंद्र मिळण्यासाठी लिंक खुली केली आहे. त्यानुसार जवळचे परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न राहील, असेही डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.