आयुक्तांच्या आदेशानंतरही अनावश्यक कामांची यादी देण्यास टाळाटाळ कशासाठी?
पुणे – महापालिका आयुक्तांनी 2020-21 या वर्षाच्या अंदाजपत्रकातील अनावश्यक कामे न करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच अशा कामांची यादी तातडीने सादर करण्याच्या सूचना सर्व विभाग प्रमुखांना दिल्या होत्या. मात्र, अशी कामे रद्द केल्यास ठेकेदरांची अडचण होण्याची भीती असल्याने अनेक विभाग प्रमुखांनी अशा कामांची यादीच अद्याप सादर केलेली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा सर्व विभाग प्रमुखांना पत्र पाठवून 15 एप्रिलच्या आत ही यादी पाठविण्याचे आदेश विभाग प्रमुखांना दिले आहेत.
शहरात करोनाच्या साथीने थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे केंद्रशासनाकडून देशभरात करण्यात आलेले लॉकडाउन अनिश्चित काळासाठी पुढे जाऊ शकते, तसेच या साथीला अटकाव घालण्यासाठी महापालिकेस अत्यावश्यक सेवांसह, आरोग्य यंत्रणेवर मोठया प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. त्यातच, लॉकडाउनमुळे महापालिकेचे उत्पन्नही घटले आहे. ही बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी अनावश्यक कामे थांबवण्यासाठी हे आदेश काढले होते.
महापालिकेकडून दरवर्षी शहरात सुमारे 1200 ते 1500 कोटींचा खर्च भांडवली कामांवर केला जातो. यात जवळपास 400 ते 500 कोटींची कामे तीच तीच असतात, तसेच केवळ खर्च करायचा म्हणून नगरसेवकांच्या आग्रहाखातर क्षेत्रीय कार्यालयाकडून तसेच मुख्य खात्याकडून ही कामे केली जातात. त्यामुळे हा निधी विनाकारण वाया जातो. त्यातच, या मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाल्याने महापालिकेस मार्च अखेरीस मिळणारे उत्पन्न लक्षणीय घटले आहे.
अशा स्थितीत आरोग्य सेवांसाठी पालिकेस मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून नवीन अंदाजपत्रक सुरू होण्यापूर्वीच महापालिका आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांना तातडीचे आदेश काढत, अंदाजपत्रकातील प्रस्तावित करण्यात आलेली अनावश्यक कामे तसेच महत्त्वाची कामे याची यादी देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, एकाही विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरात अनावश्यक कामे होतच नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वित्त व लेखा विभागाने पुन्हा एकदा सर्व विभागांना पत्र पाठवित पाच दिवसांच्या आत ही माहिती कळविण्याच्या सूचना केल्या आहेत.