नगर – तपोवन रस्त्याच्या कामात अधिकारी आणि ठेकेदाराची मिलीभगत आहे. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने आलेल्या निधीच्या कामात झालेल्या गैरकारभारास स्थानिक अधिकारी व ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आज केला.
कोट्यवधी रुपये खर्चून तयार होत असलेला तपोवन रस्ता पहिल्याच पावसात खचला. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व स्थानिक नगरसेवकांनी रस्त्याच्या कामाची तक्रार करत आंदोलनाचा इशारा इशारा दिला होता. आमदार संग्राम जगताप यांनीही तपोवन रस्त्याच्या कामाबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केली होती.
त्यामुळे या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नागपूर येथील एक पथक नगर शहरात दाखल झाले. त्यांच्याकडून रस्त्याच्या कामाचे सर्वेक्षण सुरु केले आहे. पथकातील अधिकाऱ्यांसमवेत नगरसेवक डॉ. सागर बोरूडे, विनित पाऊलबुधे, सुनील त्रिंबके, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, शिवाजी चव्हाण आदींनी पाहणी करुन झालेल्या कथित गैरकाराभाराबद्दल संताप व्यक्त केला.
पहिल्याच पावसात तपोवन रस्ता खचल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्य केले. तसेच, हा रस्ता डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अंदाजपत्रकाप्रमाणे पूर्ण करून देण्याचे व तोपर्यंत ठेकेदाराला कामाचे बिल देण्यात येणार नसल्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी बारस्कर यांना दिले होते.
त्यानुसार हे पथक रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले असल्याची माहिती बारस्कर यांनी दिली. पथकात चार अधिकारी आहेत. हे पथक तीन दिवस नगर शहरात राहणार आहे. पथकाने आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास तपोवन रस्त्याला भेट दिली.