आपत्ती काळात अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे : आ. शंभूराज देसाई

पाटण – पाटण तालुक्‍याच्या विविध भागांसह कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने आणखी दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुसळधार पडणारा पाऊस तर कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने दक्ष राहण्याच्या सूचना आमदार शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पाटण तहसिल कार्यालयात आपत्ती निवारण यासाठी आयोजीत बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्यासह तालुक्‍यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी अतिवृष्टी काळात दक्ष राहून काम करावे ज्याठिकाणी आपत्तीसारखी घटना घडेल. त्याठिकाणची माहिती त्वरीत आपत्ती निवारण कक्षाला कळवावी. आरोग्य विभागाने विशेष दक्षता घेवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्याठिकाणी तातडीने डॉक्‍टर्स उपलब्ध करून द्यावेत. जेणे करून नागरिकांना तात्काळ आरोग्य सुविधा देण्यात येतील. पाटण येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे. रुग्णांना सेवा देण्यासाठी कर्मचारी वर्ग नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. त्याबाबतीत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून लवकरात लवकर पुरेसा कर्मचारी नेमण्याची व्यवस्था करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

पाऊस सुरू झाला की महावितरण कंपनीच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी वाढत असतात. संबंधित अधिकाऱ्यांनी काळजी घेवून लोकांना त्रास होणार नाही. याची खबरदारी घ्यावी. जुने विद्युत पोल बदलण्यासाठी तसेच दुरूस्तीच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.
तालुक्‍यातील 54 शाळा खोल्यांची अवस्था दयनिय झाली आहे.

या शाळा खोल्या धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे याठिकाणी वर्ग भरवू नका 54 पैकी 15 शाळांच्या खोल्या दुरूस्तीसाठी पैसे उपलब्ध असल्याचे बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता रविंद्र भंडारे यांनी सांगितले.ढेबेवाडी विभागातील मराठवाडी धरणातून पाणी सोडल्यानंतर खळे येथील पुल पाण्याखाली जातो. त्याबाबत बांधकाम विभागाने दक्षता घ्यावी. कोयना धरणातून 2100 क्‍युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. त्याबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी. आपत्ती काळात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन चालू असावे. आपत्ती निवारण कक्षात कोणी नसल्याचे मला आढळून आले आहे. मी स्वत: रात्री फोन केला त्यावेळी माझा फोन कोणीही उचलला नाही. त्यामुळे अधिकारी किती दक्ष आहेत, याचा नमुना पहावयास मिळाला. त्यामुळे इथून पुढे दक्षता घ्यावी.

सततचा पडणारा पाऊस व कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे मुळगाव पुलावरील वाहतुक धोका निर्माण होण्याच्या अगोदर बंद करावी. सडावाघापूर याठिकाणी असणाऱ्या रिव्हर्स पॉईंट धबधब्याजवळ बंदोबस्त ठेवावा व पोलीसांनी बॅरेकेटस लावावी. आपत्ती काळात कोणत्याही विभागातील अधिकाऱ्याने कुचराई केल्यास निर्दशनास आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशारा आ. देसाई यांनी दिला.

आपत्ती निवारणाच्या आजच्या बैठकीत आ. शंभूराज देसाई यांनी बांधकाम विभागाला चांगलेच धारेवर धरले. कराड-चिपळूण रस्त्याची अवस्था फार दयनिय झाली आहे. संगमनगर धक्का ते हेळवाकपर्यंत रस्त्याची बिकट अवस्था झाली असताना बांधकाम विभागाने दुरूस्ती का केली नाही.पाऊस कमी झाल्यानंतर रस्त्याची डागडुजी करावी, अशा सूचना आ. देसाई यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)