महापालिकेच्या सभेत रस्ते, पाणी व आरोग्य विभागाचे वाभाडे
नगर – राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारणे, शहरातील रस्ते, वारंवार विस्कळीत होणारा पाणीपुरवठा, फेज-2 पाणीयोजनेसह अमृत योजनेवरून आयुक्तांसह अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी आज झालेल्या महापालिकेच्या महासभेत चांगलेच धारेवर धरले. आयुक्तांसह अधिकारी नगरसेवकांना वेड्यात काढतात, अशा शब्दात विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी वाभाडे काढले. पुलाचे कौतुक करता; पण त्याच पुलाखाली शहरातील रस्त्यांची स्थिती पाहिल्यानंतर लाज वाटते. नागरिक थेट शिव्या घालत आहेत. आता तरी रस्त्यांची कामे करा, असे मत नगरसेवक महेंद्र गंधे यांनी व्यक्त केले.
महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी महासभा सुरू झाली. या वेळी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसचिव एस. बी. तडवी आदी उपस्थित होते.
डॉ. सागर बोरुडे यांनी शहरात वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. वीजपुरवठा खंडित झाल्याने व जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा खंडित होत असून, त्याचा नगरकरांना खूप त्रास होत आहे. यावर पाणीपुरवठा विभागाचे अभियंता परिमल निकम यांनी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे, हे खरे आहे. पाच मिनिटे जरी वीजपुरवठा खंडित झाला, तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अडीच तास लागतात. त्यात सुधारणा करण्याबाबत महावितरणबरोबर चर्चा करण्यात आली आहे.
या वेळी फेज-2 व अमृत योजनेवर चर्चा झाली. केवळ 20 मीटर कामासाठी एक ते दीड वर्ष का लागले, असा सवाल बाबासाहेब वाकळे यांनी केला. त्या वेळी आराखडा मंजूर नसतानाच ठेकेदाराने काम केल्याचे उघडकीस आले. त्यावरून पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.या वेळी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी डिसेंबरपर्यंत नव्याने पंप येणार असून, ते बसविल्यानंतर नगरकरांना पूर्ण दाबाने व पूर्ण क्षमनेने पाणी मिळेल, अशी ग्वाही दिली. त्या वेळी वाकळे यांनी शहरातील रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महेंद्र गंधे म्हणाले की, शहरातील एकही रस्ता चांगला राहिलेला नाही.
लोकांच्या शिव्या घाव्या लागत आहेत. निधी आहे, मंजुरी आहे, मग रस्त्यांची कामे का होत नाही? जे ठेकेदार काम करणार नाही त्यांना काळ्या यादीत टाका, असे गंधे म्हणाले. बाबासाहेब वाकळे यांनी सावेडी नाका ते भिस्तबाग रस्ताकाम दोन वर्षांपासून ठप्प आहे. कार्यारंभाचे आदेश देऊनही काम सुरू झाले नाही. त्यावर बांधकाम विभागाचे अधिकारी सुरेश इथापे म्हणाले की, केवळ 13 मीटरमधील अतिक्रमणामुळे रस्त्याचे काम थांबले आहे. त्यावर वाकळे म्हणाले की, अतिक्रमण सोडून रस्त्याचे काम करावे. तसे काम करता येणार नाही, असे इथापे म्हणाले. त्यावेळी वाकळे यांनी आयुक्तांना वारंवार निवेदन या रस्त्याबाबत दिले. त्यांनी आता या रस्त्याबाबत उत्तर द्यावे, असा आग्रह धरला. मात्र, आयुक्तांनी बोलण्यास नकार दिला. अखेर आयुक्त डॉ. जावळे म्हणाले की, हा रस्ता अंदाजपत्रकानुसार होणार असून, अतिक्रमणदेखील काढावे लागले तरी ते काढून रस्ता पूर्ण करणार, असे आश्वासन दिले.
आंघोळी व धुण्याचे पाणी नगरकरांना
नागापूर येथे फेज-2 योजनेतून पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. त्या टाकीचे संरक्षण होत नसल्याने त्या ठिकाणी अवैध व्यवसाय चालू असून, ते लोक या टाकीत आंघोळी करून कपडे धूत असल्याची माहिती राजेश कातोरे यांनी दिली. त्यानंतर सभेत एकच गोंधळ झाला. विशेष म्हणजे टाकीला झाकण नसल्याने हे लोक गैरफायदा घेत आहे. मात्र, अधिकारी सातपुते यांनी हा विषय फारसा गांभीर्याने न घेता आठ ते दहा दिवसांत झाकण बसवतो, असे उत्तर दिले. त्यावर उपमहापौर गणेश भोसले यांनी झाकण बसविण्यासाठी आठ दिवस कशाला, उद्या ते काम करा, असे सुनावले.
पे अँड पार्कचा घाट!
धोरण ठरविण्यापूर्वी व निविदा काढण्याअगोदरच शहरात पे अँड पार्कचा घाट घालण्यात आला. मात्र, तो आयुक्तांनी हाणून पाडला. संपत बारस्कर, स्वप्नील शिंदे, डॉ. सागर बोरुडे यांनी शहरात पे अँड पार्कसाठी संस्था आली असून, त्या संस्थेला लगेच काम देण्यात यावे. त्यासाठी सभेत मंजुरी द्यावी, असा आग्रह धरला. याबाबत अभियंता निकम म्हणाले की, शहरात वाहनतळाबाबत एका संस्थेने सर्व्हे केला आहे. मात्र, कोणते रस्ते त्यासाठी द्यावेत, हे महापालिका ठरवेल. याबाबत आयुक्तांनी ही आर्थिक बाब असल्याने धोरण ठरविल्यानंतर निविदा काढून कोणाला काम द्यायचे हे ठरविण्यात येईल, हे स्पष्ट केले.