भाड्याने घेतलेल्या टॅंकरविषयी अधिकाऱ्यांनाच माहिती नाही

कोल्हापूर – अतिवृष्टी आणि महापुराच्या आपत्ती दरम्यान महापालिकेने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी भाडयाने टॅंकर घेतले. मात्र भाडयाने घेतलेल्या टॅंकरची नेमकी संख्या किती, भाडे किती याबद्दल महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नेमकी माहिती नसल्याचे मंगळवारी सामोरे आले. 

कोल्हापूर शहरात महापूर काळात पिण्यासाठी पाणी पुरवठ्याचे केलेल्या नियोजनाबाबत कोल्हापूर शहर नागरी कृती समितीने मंगळवारी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे जल अभियंता अजित साळुंखे यांची भेट घेतली.

तास ते दीड तास झालेल्या चर्चेत अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा भाडयाने घेतलेल्या टॅंकरची संख्या 74 सांगितली, नंतर 45 टॅंकर घेतल्याचे व थोडया वेळाने 40 व शेवटी 38 टॅंकर भाडयाने घेतल्याचे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

आकडेवारीतील ही विसंगती आणि चर्चेअंती भाडयाची रक्कम सांगण्यास झालेली टाळाटाळ, यामुळे टॅंकरचे भाडे आणि संख्या यामध्ये गोलमाल असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, यानंतर महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन पाणी पुरवठा विभागातील हा सावळागोंधळ निदर्शनास आणला. प्रशासक बलकवडे यांनी पाणी पुरवठा विभागाकडे यासंबंधीची माहिती घेऊ असे सांगितले. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासक बलकवडे यांची भेट घेतली तेव्हा जल अभियंता साळुंखे उपस्थित नव्हते.

तत्पूर्वी कृती समितीच्या शिष्टमंडळाने जल अभियंत्यांची भेट घेतली. “या वर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि पंचगंगा नदीला महापूर आला.त्यामुळे महापालिका पाणी पुरवठा विभागाची उपसा केंद्रे पाण्यात बुडाली.

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी कळंबा फिल्टर हाऊस येथून टॅंकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.परंतु कोणत्याही प्रकारचे योग्य नियोजन नसल्यामुळे पाणी पुरवठा नियोजनाचा बट्याबोळ झाला. टॅंकरमधे पाणी भरणेसाठी लांबच्या लांब रांगा दिसून आल्या. महापालिकेने भाडयाने घेतलेले टॅंकर कोठेही न पाठवता जागेवरच उभे होते.’असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जल अभियंत्यांना सांगितले.

शिंगणापूर व बालिंगा योजना महापूर काळात पाण्याखाली जाते त्याकरिता त्या उपसा केंद्राची उंची वाढवण्यासाठी व विद्युत मोटारी सुरक्षिततेच्या दृष्टीने उंच बसवण्यासाठी शासन निधी उपलब्ध झाला आहे असे समजते तर या सर्व प्रक्रियेस विलंब का होत आहे ? तसेच कळंबा तलावातून किती लाख लिटर पाणी शुद्धीकरण करून कशा प्रकारे वितरीत केले यासंबंधीची माहिती द्यावी अशी मागणी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.