पदाधिकाऱ्यांनाही आढळले युरिया, भुंगे अन्‌ सोनकीडे

गणेश घाडगे

पोषण आहाराच्या धान्याचे वाटप बंद करा : लंघे “दैनिक प्रभात’ चा दणका
जिल्हास्तरावरून चौकशीचे आदेश

शिवसेना उतरणार रस्त्यावर
तालुक्‍यात महिला व बालकल्याण विभागामार्फत वाटप करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या धान्याच्या पिशव्यांची पाहणी करून त्या शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के यांनी ताब्यात घेतल्या आहेत. तसेच अंगणवाडीसेविकांना या पिशव्या वाटप न करण्याचे आवाहन केले आहे. पोषण आहार जनावरे देखील खाणार नाहीत, यामध्ये रासायनिक खताची भेसळ झाल्याचे समोर आले असून हि भेसळ महिला व बालकांनी खाल्यास मोठा धोका निर्माण होणार असल्याने याबाबत शिवसेना रस्त्यावर उतरणार असून रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले.

नेवासे  – नेवासे तालुक्‍यातील वरखेड गावामधील अंगणवाडीच्या मार्फत वाटप होत असलेल्या पोषण आहाराच्या कच्च्या धान्यात युरिया आढळल्या दैनिक प्रभात ने दिलेल्या वृत्ताची प्रशासनासह या गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांसह माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी दखल घेवून अंगणवाडी परिसराची माहिती घेतली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य डॉ. तेजश्री लंघे यांनी केलेल्या पहाणीत गव्हाच्या पिशवीत युरिया खताचे दाणे तर मटकी, तांदूळ व चवळीच्या पिशव्यामध्ये भुुंगे, सोनकीडे आढळून आले तर मिठामध्ये निरम्यासारखे खडे आढळून आले. हे धान्य जनावरे देखील खाणार नाही, शासन पिढीच बरबाद करीत असल्याचा आरोप लंघे यांनी केला. दरम्यान, प्रकल्प अधिकारी सुनील अंकुश यांना नेवासे तालुक्‍यात धान्याचे वाटप बंद करून आजवर वाटप झालेल्या धान्याच्या पिशव्या पंचायत समितीमध्ये जमा करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी लंघे यांनी केली. तसेच महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

नेवासा तालुक्‍यातील पंचायत समिती सदस्या सुषमा संजय खरे यांच्या वरखेड गावामध्ये अंगणवाडी क्रमांक 85 मध्ये “पोषण आहाराच्या धान्यात युरिया’ या मथल्याखाली दैनिक “प्रभात’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या अधिकारी, पदाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी मंगळवारी सकाळी 9 वाजता वरखेड येथे अंगणवाडीला भेट देऊन गरोदर, स्तनदा माता व कुपोषित बालकांना देण्यात येत असलेल्या कच्च्या धान्याच्या पिशव्या फोडून पाहाणी केली. तेव्हा त्यांनाही गव्हाच्या पिशवीत युरियाचे दाणे मोठ्या प्रमाणात आढळले तर मटकी, तांदूळ, चवळीला मोठाले भुंगे, सोनकीडे व मिठात निरम्यासारखे खडे आढळून आले. हा आहार जनावरांना ठेवला, त्यांनी देखील खाल्ला नाही. हा आहार नवीन पिढी घडवण्यासाठी येत असल्याने यातून नवीन पिढी बरबाद झाल्याशिवाय राहणार असा प्रश्न लंघे यांनी उपस्थित करीत शासनाच्या योजनेवर नाराजी व्यक्‍त केली. जिल्हा परिषदेत आवाज उठवणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या डॉ. तेजश्री लंघे यांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.

यावेळी नेवासे प्रकल्प अधिकारी सुनील अंकुश, वडाळा प्रकल्प अधिकारी ढाकणे, पंचायत समिती सदस्या सुषमा खरे, सरपंच वंदना कुंढारे, श्रीरंग हारदे, ज्ञानेश्वर उंदरे, संजय खरे, विलास इवले आदी ग्रामस्थ व पालकांनी अंगणवाडी क्रमांक 85 ला भेट देऊन पाहणी केली. यावर जिल्हा लंघे यांनी संबधित अधिकारी सुनील अंकुश, ढाकणे यांना सुचना केल्या की, या मालाचे वाटप त्वरित बंद करून तालुक्‍यात वाटप केलेला माल नेवासा पंचायत समितीला जमा करण्याचे आदेश दिले.
यावेळी डॉ. तेजश्री लंघे म्हणाल्या, याबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलणार असून सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करणार आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी सुनील अंकुश यांनी पालकांचा जबाब घेतला तसेच अंगणवाडीसेविकांना आदेश देऊन प्रत्येक घरोघर जाऊन धान्य पाहून त्या विषयी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. याबाबत वरिष्ठांना अहवाल देण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, अंकुश यांनी वरखेड शेजारी असलेल्या गोपाळपूला भेट देऊन धान्य पाहणी केली.

नेवासे तालुक्‍यात नेवासे व वडाळा असे दोन प्रकल्प कार्यालय असून दूरध्वनीवरून तालुक्‍यातील पुरवठ्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या अधिकाऱ्याकडे कोणतीच माहिती नसून ही माहिती देण्यास सपशेल टाळाटाळ केल्याने नेवासे तालुक्‍यातील महिला बाल कल्याण विभागाचा कारभार रामभरोसे असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
तालुक्‍यातील सर्वच अंगणवाडीमध्ये दैनिक प्रभातच्या टीमने जाऊन पाहणी केल्यावर सर्वच अंगणवाडीत भेसळ व निकृष्ट मालाचा दर्जेदार नमुना समोर आला आहे. याबाबत दैनिक प्रभातला अनेक सामाजिक कार्यकर्तेनी फोन करून भेसळयुक्त आहाराची माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.