नातेवाईकांनी नाकारल्यास शासकीय ‘अंत्यविधी’

केंद्राच्या आदेशानुसार महापालिकेचा निर्णय


आरोग्य अधिकारी, अग्निशमन दल आणि क्षेत्रीय कार्यालयांवर जबाबदारी निश्‍चित

पुणे – करोनाबाधीत व्यक्‍तींचा शासकीय अथवा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी अंत्यविधी करण्यास नकार दिल्यास स्थानिक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पंचनामा करून संबंधित व्यक्‍तीचा अंत्यविधी होणार आहे. त्यासाठीची जबाबदारी आरोग्य अधिकारी, अग्निशमन दल आणि क्षेत्रीय कार्यालयांवर निश्‍चित केली असून ही अंत्यविधी प्रक्रिया कशी असेल याचे लेखी आदेश महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त रूबल अग्रवाल यांनी दिले आहे. दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात एका करोनाबाधीत व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी कोणी करायचा यावरून गोंधळ झाला होता. त्यानंतर पालिकेने केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार हे आदेश सोमवारी रात्री उशिरा काढण्यात आले.

करोनाबाधित व्यक्‍तीचे शव अंत्यविधी हाताळताना संबंधित व्यक्‍तींना या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे आवश्‍यक ती सुरक्षा साधणे आणि उपाययोजना करूनच संबंधित व्यक्‍तीवर तातडीने अंत्यसंस्कार करणे आवश्‍यक आहे.यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने संबंधित व्यक्‍तीवर दहन अथवा दफन करायाचा अंत्यसंस्कार तातडीने करायचा आहे.

त्यासाठी अग्निशमन दल अथवा पीएमपीने रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यायची असून संबंधित शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक यांच्या देखरेखेखाली संबंधित शव प्लॅस्टिकच्या सुरक्षित बॅगमध्ये पॅक करून उपलब्ध असलेल्या वाहनात ठेवायचे आहे. त्यानंतर तातडीने अंत्यविधी करून संबंधित शववाहिनीचे 100 टक्‍के निर्जंतुकीकरण करायचे आहे. तर संबंधित व्यक्‍तीचे नातेवाईक अंत्यविधीसाठी उपलब्ध असल्यास कोणताही पंचनामा न करता रुग्णालयातील नियमित प्रक्रियेनुसार, आवश्‍यक बाबींची पूर्तता करून केंद्राच्या सूचनांनुसार, संबंधित व्यक्‍तीचा अंत्यविधी अथवा दफन विधी केला जाणार आहे.

कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने देणे बंधनकारक
केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, संबंधित व्यक्‍तीच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी असलेल्या शववाहिनी तसेच स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना संपूर्ण सुरक्षा साधणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची असणार आहे. मृत व्यक्‍तीस हातळणाऱ्या व्यक्‍तींना करोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याने आवश्‍यक त्या सुरक्षा साधणांची पूर्तता करूनच अंत्यविधी करण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना केंद्राने केल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.