शैक्षणिक दर्जात सुधारणा करण्यासाठी पुढाकार
पुणे – राज्यातील शैक्षणिक दर्जात सुधारणा व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागातील प्रशासन व प्रशिक्षण या दोन्ही शाखांमधील अधिकाऱ्यांना पदोन्नतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीची अर्हता लागू करण्यात आली आहे. हे अधिकारी एकाच संवर्गात आणून त्यांना पदोन्नत्या देण्यात येणार असून त्याचा मार्ग मोकळा आहे. त्याबाबतचे आदेशही शासनाकडून जारी करण्यात आले आहे.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रमांची आखणी करण्यात येत असते. त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना ही अधिकाऱ्यांना बजाविण्यात येतात. मात्र, गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणी करण्याची आठवण होतेच असे नाही. शिक्षण विभागात प्रशासन व शिक्षण सक्षमीकरण म्हणजेच प्रशिक्षण शाखा कार्यरत आहेत. प्रशासन शाखेत दोन पदोन्नती साखळ्या आहेत.
एका पदोन्नती साखळीमध्ये शिक्षण संचालक ते उपशिक्षणाधिकारी ही पदे आहेत. या पदांच्या साखळीमध्ये शैक्षणिक अर्हता ही बी.एड.अशी होती. दुसऱ्या साखळीमध्ये अधिक्षक, प्रशासन अधिकारी ही पदे आहेत. या साखळीसाठी शैक्षणिक अर्हता ही कोणत्याही शाखेची पदवी अशी होती. प्रशासन शाखेत आता एकच पदोन्नती साखळी करण्यात येणार आहे.
सेवा प्रवेश नियमात आवश्यक बदल होणार
महाराष्ट्र शिक्षण सेवामधील शिक्षणाधिकारी व तत्सम गट-अ व प्रशासन अधिकारी गट-अ पदाची सहाव्या वेतन आयोगामधील वेतनश्रेणी एकच आहे. शिक्षणाधिकारी व तत्सम पदांमध्ये प्रशासन अधिकारी हा संवर्ग करण्यास नियुक्ती प्राधिकारी या नात्याने तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. उपशिक्षणाधिकारी व तत्सम गट-ब व अधिक्षक गट-ब पदाची सहाव्या वेतन आयोगातील पदोन्नती एकच आहे. या सर्वच पदांचे संवर्ग एकत्रीकरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर यांनी जारी केले आहेत.
पदांच्या सेवा प्रवेश नियमात आवश्यक ते बदल करण्यात येणार आहे. प्रशासन व प्रशिक्षण या संवर्गाचे एकत्रिकरण करण्यात येणार असल्याने अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पदोन्नती मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धाही लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पुढची रणनिती आखण्यासाठी अधिकारी संघटनांच्या गटागटांनुसार बैठकांचे सत्र सुरू झालेले आहे.