पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध विभागांमध्ये तीस वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या आणि वयाची पन्नाशी पूर्ण करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यसक्षमता तपासणी केली जाणार आहे. या तपासणीसाठी बोर्डातर्फे “पडताळणी समिती’ नियुक्त करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत बोर्डाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची सक्षमता तपासणी करून, त्याबाबत योग्य कारवाई करण्याचे निर्देश संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.
देशातील बहुतांश कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून ही तपासणी केली जात आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बुधवारी झालेल्या विशेष सभेत या तपासणी संदर्भात एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये बोर्डाचे अध्यक्ष बिग्रेडिअर कुलजित सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, सह मुख्य कार्यकारी अधिकारी गजभिये, उपाध्यक्ष विवेक यादव आणि नगरसेवक अतुल गायकवाड यांचा समावेश असणार आहे.
याबाबत अमितकुमार म्हणाले, “कॅन्टोन्मेंट कायदा 2006 कलम 56 आणि 48 नुसार बोर्ड प्रशासनात कार्यरत असलेले आणि वयाची 55 वर्षे पूर्ण तसेच 30 वर्ष प्रशसनात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची शारीरीक क्षमता, कामातील कार्यकुशलतेची तपासणी होणार आहे.
यासाठी आवश्यक प्रस्ताव विशेष सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला असून, पडताळणी समितीचे गठणही करण्यात आले आहे. बोर्डात सध्या 700हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी 211 कर्मचारी हे कार्यसक्षमता तपासणीसाठी पात्र ठरत आहेत. पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.’
दर सहा महिन्यांनी होणार तपासणी
कॅन्टोन्मेंट कायद्यानुसार 55 वय पूर्ण करून 30 वर्षे नोकरीत कार्यरत असलेला प्रत्येक अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांतून एकदा कार्यकुशलता, तत्परता याची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत ही तपासणी झालेली नाही. आगामी काळात बोर्डात प्रत्येक सहा महिन्यांनी ही तपासणी होणार आहे.