शिक्रापूर : केंदूर (ता. शिरुर) हे शिरुर तालुक्यातील दुष्काळी समजले जाणारे व तालुक्यात २००८ मध्ये दारूबंदीसाठी उभी बाटली मतदान घेऊन आडवी बाटली केली. दारूबंदीचा निर्णय घेवून आदर्श निर्माण करणारे गाव मात्र सध्या या गावामध्ये पदाधिकाऱ्यांकडून दारूबंदीच्या निर्णयाला हरताळ फासले जात आहे. सरपंचच गावात बेकायदेशीरपणे दारुविक्री करीत असल्याने दारूबंदीचा निर्णय बासनात गुंडाळला आहे.
केंदूर हे माजी गृह राज्यमंत्री असलेल्या बापूसाहेब थिटे यांचे दुष्काळी समजले जाणारे गाव आहे. मात्र, गावामध्ये महिलांनी तत्कालीन सरपंच विमल थिटे यांच्या पुढाकाराने दारूबंदीसाठी उभी बाटली व आडवी बाटली मतदान घेऊन दारूबंदीचा निर्णय घेवून दारूबंदी केली. काही नागरिकांनी गावामध्ये कुऱ्हाडबंदी करीत वृक्षारोपण करुन गाव पाणीदार करण्याचे प्रयत्न केल्याने शिरुर तालुक्यात आदर्श निर्माण करणारे गाव म्हणून केंदूर गावची ओळख निर्माण झाली. मात्र, गेल्या दहा वर्षांत गावामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीपणे दारुविक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अनेकदा दारु विक्री करणाऱ्यावर दारूसाठ जप्त करीत गुन्हे देखील दाखल केले आहेत.
नुकतेच पोलिसांनी आठवड्यात केलेल्या दारु अड्ड्यांवरील छाप्यामध्ये खुद्द विद्यमान एका हॉटेलमध्ये सरपंच अमोल शांताराम थिटे तर एका हॉटेल मध्ये एका माजी उपसरपंच असलेल्या व्यक्तींचा पुतण्या शिवाजी थिटे या दोघांना दारु साठ्यासह ताब्यात घेत त्यांच्या जवळील दारुसाठा जप्त करीत दोघांवर गुन्हे दाखल केले.
मात्र, दरम्यान दारूबंदी असलेल्या गावामध्ये थेट सरपंच स्वतः हॉटेलमधून दारुविक्री करीत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दारूबंदीसाठी झटणाऱ्या महिला पदाधिकारी यांनी देखील नाराजी व्यक्त करीत संताप व्यक्त केला आहे.
नातेवाईकांची सोयरिक
केंदूर गावामध्ये महिलांनी दारूबंदीसाठी स्वतंत्र मतदान घेऊन गावामध्ये दारूबंदी केलेली आहे. सध्या गावामध्ये अनेक ठिकाणी दारुविक्री केली जात असताना दारु विक्री करणाऱ्यांना व्यक्तींमध्ये थेट स्वतः सरपंच व आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असताना महिला पदाधिकारी गप्प का, असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.
केंदूर गावामध्ये सरपंच स्वतः दारु विक्री करीत असल्याची बाब हास्यास्पद आहे. मात्र, पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोठेही बेकायदेशीरपणे दारु विक्री केली जात असेल तेथे आम्ही कारवाई करीत आहे. कारवाईमध्ये कोणाचीही गय करीत नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी सांगितले.