अधिकाऱ्यांना पदोन्नत्यांचे नुसतेच अामिष

मागील वर्षभरापासून नुसतेच झुलवत ठेवल्याने अधिकारी कंटाळले

 

  • चारवेळा पसंती नोंदवूनही अंतिम निर्णय होईना
  • पुणे विभागातच पदोन्नती मिळविण्यासाठी स्पर्धा

पुणे – शालेय शिक्षण विभागातील शिक्षण उपसंचालकांची 26 पदे अनेक वर्षांपासून रिक्‍त आहेत. यातील 16 पदे पदोन्नतीने भरण्यासाठी मागील वर्षभरापासून प्रक्रिया सुरू आहे. अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत चारवेळा महसूल विभागाची पसंती मागवली. वारंवार पसंती नोंदवून अधिकारीही कंटाळले आहेत. पदोन्नती द्यायची असेल, तर लवकर द्या मात्र आता झुलवत ठेवू नका, अशा शब्दात अधिकाऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्‍त होत आहे.

राज्यात शिक्षण उपसंचालकांची एकूण 35 पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ नऊच भरली असून उर्वरित रिक्‍त आहेत. या पदांचा अतिरिक्‍त कार्यभार कोणत्या ना कोणत्या अधिकाऱ्यांवर सोपवून शिक्षण विभागाचे कामकाज सुरू आहे. अतिरिक्‍त कार्यभाराच्या ओझ्याने अधिकारीही वैतागले आहेत.

कार्यालयातील विविध प्रकरणे मुदतीत मार्गी लावण्यातही अडचणी येत आहेत. पदोन्नतीद्वारे महत्त्वाच्या कार्यालयात संधी मिळावी म्हणून काही बड्या अधिकाऱ्यांनी एक-दीड वर्षांपासून मंत्रालय वारी केली. राजकीय व इतर वजन वापरण्याची तयारीही ठेवली. मात्र, अद्याप त्यांनाही यश मिळालेले नाही.

शासनाने खुल्या प्रवर्गातून पदोन्नत्यांसाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी तयार केली. यात औदुंबर उकिरडे, सुधाकर तेलंग, सुभाष बोरसे, हारुन आत्तार, वंदना वाहूळ, राजेश क्षीरसागर, अर्चना कुलकर्णी, संदीप संगवे, राजेंद्र अहिरे, वैशाली जामदार, श्रीराम पानझाडे, शैलजा दराडे, अनिल साबळे, रमाकांत काठमोरे, डॉ. गणपत मोरे, शिवलिंग पटवे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या सर्वांनाच पदोन्नती मिळणार आहे. मात्र, कोणाला कोणत्या कार्यालयात संधी मिळणार याबाबत उत्सूकता आहे. या अधिकाऱ्यांकडून नियुक्‍त्यांसाठी महसूल विभाग वाटपाबाबत पसंती किंवा विकल्प मागविण्याचे सोपस्कार बऱ्याचदा केले.

Leave A Reply

Your email address will not be published.