नवले चौक ते दरीपूल रस्त्यावरील अपघात रोखण्यास करणार उपाययोजना
आंबेगाव बुद्रुक – पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले चौक ते जांभुळवाडी दरीपूल या रस्त्यावर होणारे अपघात थांबविण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह आमदार भीमराव तापकीर यांनी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत रस्त्याबाबतीत विविध उपाययोजना मांडण्यात आल्या. त्याच्या अंमलबजावणीसाठी वाहनांचा ताफा घेऊन जाणे टाळत आमदार तापकीर यांनी अधिकाऱ्यांसह आज नवले चौक ते दरीपूल या संपूर्ण रस्त्याची पाहणी पायी दौरा करीत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कदम, कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, आंबेगावचे माजी नगसेवक शंकरराव विठ्ठलराव बेलदरे, भाजपा युवा नेते संदीप बेलदरे, दिनेश पोफळे, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, अरुण राजवाडे आदी उपस्थित होते.
दरीपूल येथून वाहने वेगाने नवले चौकाकडे येताना, वाहनांचा वेग कमी करण्याच्या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी रंबलर्स बसवणे, स्पीडगन बसविणे, त्याचप्रमाणे नवले चौकामध्ये रुंदीकरण करणे, अशा प्रकारच्या उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी सर्व कामे तातडीने सुरू करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.