पिंपरी – दिवाळी संपल्यानंतर पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर महावितरणसह एकूण चार कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. महावितरण, महापारेषण, विद्युत निर्मिती व मुख्य कंपनी असलेले महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या चार कंपन्यांमधील सुमारे 86 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मासिक वेतनात ही रक्कम जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कारभारात सुसूत्रता यावी, या मंडळाचे अस्तित्व कायम ठेवत, वरील तीन कंपन्यांमध्ये कामकाजाची विभागणी करुन देण्यात आली आहे. तर महावितरणसह महानिर्मिती, महापारेषण या तीनही कंपन्या आर्थिक गर्तेत सापडल्या आहेत.
दिवाळी बोनसकरिता या सर्व कंपन्याचे व्यवस्थापकीय संचालक व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्या. कायम कर्मचारी, अधिकारी आणि नव्याने नियुक्त झालेले मात्र एक आर्थिक वर्ष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यावर या बैठकीत एकमत झाले. त्यानंतर या कंपन्यांच्या कार्यकारी संचालकांची एकत्रित बैठक झाल्यानंतर, सानुग्रह अनुदान देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या सर्व सोपस्करानंतर या चारही कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागाने दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याचे परिपत्रक प्रसद्धि केले आहे.
त्यानुसार कंपनीतील अधिकारी, प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी, कंत्राटी तत्वावर सन 2010-20 या कालावधीकरिता नियुक्त केलेले कायदा सल्लागार, कंपनी सेक्रेटरी यांना 12 हजार सानुग्रह दिले जाणार आहे. तर तीन वर्षांच्या नियुक्तीनंतर सेवेत कायम केले जाणारे सहाय्यक, अकाऊंटस् असिस्टं, उपकेंद्र सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, वीज सहाय्यक, विद्युत सहाय्यक या पदावर कार्यरत असलेल्या कर्मरचाऱ्यांना 7200 रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.