दुष्काळसदृश्‍य परिस्थितीत अधिकाऱ्यांची दांडी

दीड तासातच उरकली मासिक सभा; पाणीटंचाईवरून पंचायत समिती सदस्य आक्रमक

कराड – कराड तालुक्‍यात अनेक गावात दुष्काळसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत संबंधित गावांचा दौरा न करता पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी गेले अनेक दिवस गैरहजर आहेत. रजेचे कारणही पंचायत समितीस कळविले गेलेले नाही. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्यांनी गुरुवारी झालेल्या मासिक सभेत केली.

सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती फरिदा इनामदार होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक अधिकाऱ्यांवर निवडणुकीचे काम सोपविण्यात आल्याने सभेस विविध विभागाचे अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे ऐरव्ही चार ते पाच तास चालणारी मासिक सभा यावेळी फक्‍त दीड तासातच उरकली.

पाणी पुरवठा विभागावर झोड उठवताना सदस्य ऍड. शरद पोळ म्हणाले, कराड दक्षिण विभागातील अनेक गावांमध्ये पाच दिवसातून एकदाच पाणी येते. त्यामुळे या गावांमध्ये दृष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेली पंधरा दिवस ही अशीच परिस्थिती आहे. या गावांची पाहणी करुन तेथे टॅंकरची व्यवस्था करणे, ही पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची मुख्य जबाबदारी आहे. मात्र हे अधिकारी बेफिकीरपणे अनेक दिवसापासून गैरहजर आहेत. आपल्या रजेचे कारणही त्यांनी पंचायत समितीला न कळविता जिल्हा परिषदेला कळविले आहे. त्यामुळे त्यांनी हजर राहण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी ऍड. पोळ व रमेश देशमुख यांनी केली. तसेच कृष्णा कारखान्याने पैसे भरुनही वाकुर्डे योजनेचे पाणी सुरु करण्यात आले नसल्याचा आरोप केला. यावर पाणी पुरवठा विभागाच्या सहाय्यक अधिकारी यांनी वाकुर्डे योजनेचा प्रस्ताव गत महिन्यात पाठवला असल्याचे सांगितले.

शिक्षण विभागाचा आढावा गटशिक्षणाधिकारी निकम यांनी दिला. यावेळी रमेश देशमुख यांनी शिक्षण विभागातील लोकांना किती अपत्ये असावीत, सेवा पुस्तके, टेबल तपासणी आदी प्रश्‍न विचारून निकम यांचीच शाळा घेतली. आढाव्या वेळी निकम यांनी यावर्षी तालुक्‍यातील 45 मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्ती होणार असल्याचे सांगितले. तसेच शिक्षण विभागाच्या कामाबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही कौतुक केल्याचे सांगितले. केंद्रप्रमुखांकडून मागणी करण्यात आलेल्या 5 हजार रुपयांचा मुद्दा चांगलाच गाजला. त्याला विस्तार अधिकारी पळसे यांनी सडेतोड उत्तर दिले. एकात्मिक बालविकासच्या आढाव्या प्रसंगी अंगणवाडीतील मुलांना एप्रिल महिनाअखेरच शालेय पोषण आहार मिळणार असल्याचे सांगत. मे पासून पॅकेटस्‌ स्वरुपात पोषण आहार मिळणार असल्याची माहिती दिली. तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतींना कर वसूलीसाठी दि. 15 ची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यावेळी शेती, आरोग्य, बांधकाम विभागाचा आढावा घेण्यात आला.

 

सव्वा लाख रुपयांची देणी द्यायची कोठून?

पंचायत समितीचा शिक्षण विभाग केंद्रप्रमुखांकडून 5 हजार रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप सदस्य कुंभार यांनी सभेत केला. यावेळी विस्तार अधिकारी पळसे गरजले. शिक्षण महोत्सव हा तालुक्‍यातील शैक्षणिक परिस्थिती सुधारावी, यासाठी तसेच सर्वांच्या चर्चेनुसार घेण्यात आला होता. दिमाखदार झालेल्या या महोत्सवासाठी एकूण 3 लाख 57 हजार रुपयांचा खर्च आला. पंचायत समितीने 2 लाख 20 हजाराचा खर्च मंजूर केला आहे. उर्वरित सव्वा लाख रुपयांची देणी अजूनही द्यायची बाकी आहे. ती आम्ही द्यायची कोठून? असा सवाल करत सभापती, उपसभापती, सदस्य, गटविकास अधिकारी, शिक्षण विभागाचे पदाधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या झालेल्या बैठकीत विस्तारअधिकारी व केंद्रप्रमुख यांनी उर्वरित सव्वा लाख रुपयांची जबाबदारी उचलावी असे ठरले होते. त्यानुसार केंद्रप्रमुखांना 5 हजाराची मागणी करण्यात आली आहे. मात्र कोणावरही सक्‍ती करण्यात आलेली नाही. त्यांना द्यायचे नसेल तर मी स्वत: वैयक्‍तिक कर्ज काढून पैसे भरतो. मात्र शिक्षण विभागाला कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दात कुंभार यांचा आरोप हाणून पाडला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.