भातशेतीची लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून पाहणी

मावळ तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे नुकसान

वडगाव मावळ – मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह सोमवारी (दि. 4) अधिकाऱ्यांनी पाहणी केली. प्रशासनाने बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करून सर्व बाधित शेतकऱ्यांना मदत करावी अशा सूचना खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

खासदार श्रीरंग बारणे यांनी आंदर मावळातील टाकवे, माऊ, वडेश्‍वर या गावतील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली. या वेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी हरिश्‍चंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर, रोहिदास असवले, यशवंत तुरडे, शांतराम लष्करे आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. मावळ तालुक्‍यात यावर्षी 12 हजार हेक्‍टर जमिनीवर भात शेतीची लागवड झाली आहे. अतिवृष्टीमुळे जवळपास अडीच हजार हेक्‍टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. शेतीवर अवलंबून आसणाऱ्या शेतकऱ्यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मावळ परिसरात प्रामुख्याने भातशेती केली जाते. मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. या भातशेतीची खासदार बारणे यांनी पाहणी केली. ज्या भागातील भातशेतीचे नुकसान झाले आहे, त्या भागात प्रशासनाने जाऊन तात्काळ पंचनामे करावेत. बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.

कोणताही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना खासदार बारणे यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने पूर्णपणे सहकार्य केले जाईल. शासन निर्णयानुसार आर्थिक मदत केली जाईल. संपूर्ण तालुक्‍यामध्ये भातशेतीच्या झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम चार ते पाच दिवसांपासून सुरू झाले आहे. हे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण करून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अहवाल सादर केला जाणार आहे. सर्व बाधित शेतकऱ्यांना मदत केली जाईल.
– मधुसूदन बर्गे, तहसीलदार, मावळ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.