सनदी अधिकारी यशापासून दूरच

– शेखर कानेटकर 

निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी पुण्यातील मतदारांना कौल लावण्याचा आतापर्यंत अनेकदा प्रयत्न केला. पण पुणेकरांनी त्यांची डाळ शिजू दिेलेली नाही. मुख्यमंत्र्यांचे सचिव व जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी सरकारी सेवेतून मुदतपूर्व निवृत्ती घेऊन 1998 मध्ये सर्वप्रथम पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली. धर्माधिकारी हे खरे तर रा. स्व.संघ परिवाराच्या जवळचे. पण या निवडणुकीत डावपेचाचा एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या सुरेश कलमाडी यांना पाठिंबा दिलेला. त्यामुळे धर्माधिकारी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढले. संघ परिवाराशी जवळीक असल्याने त्यांना भरघोस मते पडतील, असा अंदाज होता. पण त्यांना अवघी 34 हजार 219 मते पडून त्यांची निराशाच झाली. तेही पडले, कलमाडीही पडले आणि कॉंग्रेसचे तुपे विजयी झाले.

पुण्यातील अनधिकृत बांधकाम विरोधात धडाकेबाज मोहीम उघडलेले महापालिकेचे माजी आयुक्‍त अरुण भाटिया त्या काळी पुणेकरांचे हिरो झाले होते. निवृत्तीनंतर 2004, 2009 व 2014 मध्ये त्यांनी सलग तीनदा निवडणूक रिंगणात उडी घेतली पण तीनही वेळा त्यांच्या पदरी पराभवच पडला. एवढेच काय त्यांच्या आधीच कमी पडलेल्या मतांचा आलेख घटतच गेला. 2004 च्या निवडणुकीत त्यांना 60 हजार 237 मते पडली होती. ती निम्म्याने घटून 2009 मध्ये 30 हजार 321 वर घसरली. 2014 च्या मोदी लाटेत ती 7 हजार 222 वर आली. निवृत्त पोलीस अधिकारी (आय.पी.एस.) विक्रम बोके यांनी निवृत्तीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश घेतला. 2009 मध्ये त्यांनी पुण्यातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली खरी. पण अवघ्या 2 हजार 172 मतांवर त्यांना समाधान मानावे लागले.

सरकारी पदावर असताना केलेल्या कामाचे पुणेकर कौतुक जरूर करतात पण निवडणुकीत मात्र त्यांना पुरेशी साथ न देता राजकीय नेत्यांच्याच पारड्यात मते टाकतात असे दिसते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)