वेबसाइट सुरू करण्याला मुहूर्त सापडेना
पुणे – पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची वेबसाइट काही दिवसांपासून बंद आहे. ती सुरू करण्यासाठी कार्यालयाला मुहूर्त कधी सापडणार? असा प्रश्न शिक्षक, कर्मचारी, पालक संघटनांकडून उपस्थित होत आहे.
पुणे विभागीय प्रभारी शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक यांनी अधिकारी, कर्मचारी यांना विश्वासात घेऊन या कार्यालयाची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु ठेवले. प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासही त्यांनी सुरुवात केली. कार्यालयातील गर्दी कमी व्हावी यासाठी त्यांनी नियमावलीही लावली. विविध प्रकरणांच्या मान्यतांची पत्रे संबंधितांना पोस्टाने पाठविण्यात येतील व कार्यालयाच्या वेबसाईटवर टाकण्यात येतील, असे स्पष्ट केले होते.
कार्यालयाची वेबसाईट कित्यके महिने अपडेटच केलेली नाही. शासन आदेश, परिपत्रके, सूचना याबाबतची कोणतीच कागदपत्रे त्यावर नियमितपणे अपलोड केली जात नव्हती. त्यामुळे ही वेबसाइट केवळ दिखाव्यापूरतीच राहिली. त्यामुळे विविध संघटनांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे कार्यालयात विविध मागण्यांबाबतचा पाठपुरावा करण्यासाठी संघटनांची शिष्टमंडळे गर्दी करू लागली आहेत.
लवकरच वेबसाइट सुरू होणार
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची वेबसाइट नियमित अपडेटच्या कामासाठी खासगी एजन्सी नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी निविदा मागवल्या होत्या. पात्र एजन्सीला वेबसाइटबाबतच्या कामाचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे लवकरच नव्याने व आकर्षक वेबसाइट सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.