थकबाकी परतफेडीची मल्ल्यांची पुन्हा ऑफर

नवी दिल्ली  – भारतातील मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी आपली किंगफिशर एअरलाईन्सची सर्व शंभर टक्के थकबाकी भरण्याची तयारी पुन्हा दर्शवली आहे. विजय मल्ल्याने बॅंकांकडून किंगफिशर एअरलाईन्ससाठी नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या या ऑफरचा विचार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. भारतातील बॅंकांचे कर्ज बुडवल्याबद्दल मल्ल्या यांच्या विरोधात भारतात अनेक खटले दाखल झाल्याने सध्या ते ब्रिटनमध्ये परागंदा झाले आहेत.

या संबंधात एका ट्‌विटर संदेशात मल्ल्या यांनी म्हटले आहे की, किंगफिशर कंपनीवर असलेली थकबाकीची सर्व रक्‍कम भरण्याची तयारी मी आधीच दर्शवली आहे. पण त्याला बॅंकांनी प्रतिसाद दिलेला नाही आणि भारत सरकारच्या ईडीनेही त्यावर काहीं प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्याच्या करोनाच्या अडचणीचा काळ लक्षात घेऊन यावेळी आपली ही विनंती अर्थमंत्री मान्य करतील, असा मला विश्‍वास आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

भारत सरकारने सध्या करोनासाठी जे लॉकडाऊन जाहीर केले आहे त्याची पूर्ण अंलमबजावणी आपल्या सर्व कंपन्या करीत असून आमच्या कंपन्यांचे सारे उत्पादन आता बंद आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आम्ही या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार देत असून आम्हाला या स्थितीत भारत सरकारने सहकार्य केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.