नुकसानीचे प्रस्ताव द्या, तात्काळ निधी मिळेल

पूरग्रस्त आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कराड  – तालुक्‍यात नैसर्गिक आपत्तीमुळे नदीकाठच्या अनेक गावांचे, शेतीचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे प्रशासनाच्यावतीने केले जात आहेत. तरीही ज्या गावांत जास्त नुकसान झाले आहे. तेथील सरपंच, ग्रामसेवकांनी तत्काळ नुकसानीचे प्रस्ताव सादर करावेत. त्यांना तात्काळ निधी दिला जाईल. रेठरे बुद्रूक, दुशेरे, कोडोली, खुबी, कार्वेसह पोतले या गावांतील पूर संरक्षक भिंत, विद्युत मोटारींचे झालेले नुकसान, घरे, पिक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिल्या.

येथील विश्रामगृहात तालुक्‍यातील पूरग्रस्त नुकसानीबाबत आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार, आबासाहेब शिंदे, व्ही. आर. मोरे, डॉ. अजित साजणे, लालासाहेब मोरे, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मलकापूर मुख्याधिकारी संजीवनी दळवी, मुख्याधिकारी यशवंत डांगे आदींसह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

श्‍वेता सिंघल म्हणाल्या, अतिवृष्टीचा जास्त फटका हा नदीकाठच्या गावांना बसला आहे. या गावांतील घरे, शेती, विद्युत मोटारी या पाण्याखाली गेल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची शासनाकडून तत्काळ भरपाईम्हणून दहा हजार रूपये संबंधित नुकसानग्रस्तांना दिली जात आहे. तसेच गावांत आरोग्य तपासणी शिबीरेही घेतली जात आहेत. तसेच तेथील विहीरी, विद्युत पंप, घरे यांचे पंचनामे करून प्रशासकीय मंजूरी मिळवून कामे सुरू करावीत, असे सांगीतले होते. येत्या पाच दिवसांत तालुक्‍यातील सर्व नुकसानीचे पंचनामे अधिकाऱ्यांनी करावेत व प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर करावे.

ना. अतुल भोसले म्हणाले, तालुक्‍यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. तरी देखील संबंधित नुकसानग्रस्त गावांतील सरपंच, अधिकाऱ्यांना आपल्या गावातील नुकसानीचे प्रस्ताव तयार करावेत व जिल्हा प्रशासनास तात्काळ सादर करावेत, त्यांना लवकर निधी दिला जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.