जेरुसलेम (इस्राईल) – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे थोरले चिरंजीव यायर यांनी दुर्गादेवीबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे काही भारतीयांकडून जोरदार आक्षेप घेतला गेला. त्यामुळे यायर यांनी हिंदूंची माफी मागितली आहे.
नेहमी सोशल मिडीयावर सक्रिय असलेले आणि वडील बेंजामीन नेत्यान्याहू यांच्या धोरणांची जोरदार पाठराखण करणाऱ्या यायर त्यांचे एक ट्विट अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे आढळले आहे. नेत्यान्याहू यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील फिर्यादी लाएट बेन अरी यांचा चेहरा दुर्गादेवीच्या चित्रावर चेहऱ्याच्या जागेवर बसवलेले एक चित्र यायर यांनी रविवारी सोशल मिडीयावर शेअर केले होते. या चित्रामध्ये देवीच्या अनेक हातांचे मधले बोट उंचावलेले दर्शवण्यात आले होते.
“मी हे मीम इस्राईलमधील राजकीय व्यक्तीवर टीका करण्यासाठी विडंबनाच्या एका पेजवरून घेतले होते. मात्र हे मीम हिंदू धर्माशी संबंधित एका आदरणीय देवतेशी संबंधित आहे, हे मला हे कळले नाही. आमच्या भारतीय मित्रांनी केलेल्या कॉमेंटवरून मला हे समजल्यावर लगेचच मी हे ट्विट काढून टाकले. मी दिलगिरी व्यक्त करतो.’ असे यायरने ट्विटमध्ये म्हटले आहे.
यायर यांनी केलेल्या ट्विटमध्ये देवीबरोबर आलेल्या वाघाच्या चेहऱ्यावर इस्राईलमधील अटर्नी जनरल अविशाई मॅन्डेलबिटचा चेहरा बसवण्यात आला होता. “तुला नीच लोकांची जागा माहित आहे.’ असे मीम खालील कॅप्शनमध्ये यायर यांनी म्हटले होते.
या आक्षेपार्ह ट्विटबद्दल अनेक भारतीयांनी तीव्र आक्षेप नोंदवणाऱ्या कॉमेंट केल्या. तर काही जणांनी यायर निष्काळजी आणि हिंदू देवतांबाबत अज्ञानी असल्याचा अंदाज वर्तवला. मात्र आपली चूक लक्षात आल्यावर क्षमा मागण्याचा मोठेपणा दाखवल्याबद्दल यायरचे इस्रायली लोकांनी कौतुकच केले. मात्र बेजबाबदार ट्विट केल्याबद्दल त्याच्यावर टीकाही तेवढीच झाली.
या महिन्याच्या सुरुवातीला यायर याने एका पत्रकार महिलेबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. वरिष्ठ वृत्तनिवेदिका बनण्यासाठी “तडजोडी’ केल्या असाव्यात असे त्याने म्हटले होते. त्या वक्तव्याबद्दलही त्याला माफी मागावी लागली होती.