नवी दिल्ली : भाजप प्रवक्त्या नूपूर शर्मा यांना एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण नूपूर शर्मा यांच्याविरोधात मुंबईत रझा अकादमीने एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला.
एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा सहभागी झाल्या होत्या. या चर्चेदरम्यान नूपूर यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली. या वक्तव्यामुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या असल्याचे रझा अकादमीने म्हटले.
याबाबत रझा अकादमीने मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी पायधुनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास सांगितले. पायधुनी पोलिसांनी नूपूर शर्मा यांच्याविरोधात रात्री उशिरा तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, नूपूर शर्मा या आधीदेखील आपल्या ट्वीट, वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेल्या आहेत.
नूपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली आहे. एमआयएमनेदेखील नूपूर शर्मा यांच्याविरोधात हैदराबादमध्ये तक्रार दाखल केली आहे. नूपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी एमआयएमने केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सनेदेखील नूपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजप आणि केंद्र सरकारने या बेताल वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सने केली.