पुणे : काँग्रेस पक्षाचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल तात्काळ अटक करा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी “काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाख रुपयांचे बक्षीस देऊ” अस्वस्थ बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच आज पुन्हा भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी “राहुल गांधी यांची जीभ नका छाटू तर जिभेला चटके द्या” असे आक्षेपार्ह वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे.
वाचाळवीर आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे दोघांवरती तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करा. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. याप्रसंगी पुणे शहर व जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे महासचिव कृष्णा साठे, नितीन पाटील, दीपक चौगुले, सचिन मोरे, सुनील कुसाळकर हे कार्यकर्ते उपस्थित होते.