शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पोलीस स्टेशन येथे एका आमदाराच्या फेसबुक पेजवर अश्लील व्हिडीओ टाकल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झालेला असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वप्नील अरुण गायकवाड (वय ३२ वर्षे रा. कोंढापुरी ता. शिरूर जि. पुणे) यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढापुरी (ता. शिरूर) ग्रामपंचायतचे माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड हे त्यांचे फेसबुकअकाउंट चेक करत असताना त्यांना त्यांच्या फेसबुक वर संगीताताई वानखेडे हि महिला लाईव्ह येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केल्याचे आणि शिवीगाळ केल्याचे दिसून आले.
त्यांनतर माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी संगीताताई वानखेडे (रा. चाकण ता. खेड जि. पुणे) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व पोलीस नाईक विलास आंबेकर हे करत आहे.