शिक्रापूर – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत अपशब्द वापरून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
आकाश नवले (रा. जातेगाव, ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे हवेली तालुकाध्यक्ष निलेश संभाजी गायकवाड (रा. सिद्धार्थ नगर, लोणीकंद, ता. हवेली) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आकाश नवले याने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट बनवून व्हाट्सऍप या सोशल मीडियाच्या स्टेटसमध्ये ठेवलेली होती. ती माहिती एका दलित समाजाच्या कार्यकर्त्याने स्क्रिनशॉर्ट काढून भीमा कोरेगाव 1818 या व्हाट्सऍप ग्रुपवर टाकली. अधिक माहिती घेता ही पोस्ट जातेगाव येथील आकाश नवले या युवकाने बनवल्याचे स्पष्ट झाले.
प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट बनवून व्हाट्सऍपवर टाकून दलित समाजाचा सोशल मीडियावर अपमान केला असल्याचे समोर आले. अधिक तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे प्रभारी अधिकारी अनिल लंभाते हे करीत आहेत.