बारामती- रो-हाऊस खरेदी विक्री प्रकरणातून झालेल्या वादातून बारामती तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाली असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, महेश नानासो आटोळे (वय 31, रा. खांडज ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष नारायण गावडे (रा. मेडद), अजित दत्तात्रय गावडे (रा. मळवली), अमोल अशोक राऊत (रा. शिरवली), संदीप राजाराम माळशिकारे (रा.कोऱ्हाळे), युवराज गावडे (रा. पारवडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर संतोष नारायण गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महेश नानासो आटोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रो-हाऊस खरेदी विक्रीतून दोन्ही गटात वाद निर्माण झाला.
रो-हाऊस खरेदी करताना विसार पावतीचे पैसे व्याजासह जास्त लिहून घेतले. व्याजासह पैसे दिले तरी देखील जास्तीच्या पैशाची मागणी करण्यात आली. यातून वाद झाल्याचे आटोळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे तर व्यवहार आमच्याशी पण, रो हाऊस दुसऱ्याला विकल्याची फसवणूक केली असल्याचे संतोष गावडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.