रूपगंध : शिळोप्याच्या फळगप्पा

बाबांनी आणलेली पिशवी आईने सहज उघडून पाहिली तर पिशवीत चांगली रसरशीत, लालेलाल आणि आकाराने मोठी अशी आठ डाळिंबं होती. पिशवीतली डाळिंबं तिने बाहेर काढली. एका मोठ्या ताटात ठेवली. ती लालेलाल, रसरशीत डाळिंबं पाहताच बाळूच्या तोंडाला पाणीच सुटलं.
आनंदाने तो उद्गारलाच, “व्वा! मस्तच. मला तर खूप आवडतात डाळिंबाचे दाणे.’ शमीचा मात्र हिरमोड झाला. डाळिंबांकडे पाहून नाक मुरडत ती म्हणाली, “मला तर बिलकुल आवडत नाहीत ही डाळींब. का हो बाबा, तुम्ही बाळूच्याच आवडीची फळं का आणता नेहमी? माझ्या आवडीची आणतच नाही. मला कलिंगड कित्ती आवडतं, पण किती दिवस झालेत, कलिंगड सोडा पण कलिंगडाची एक साधी खापसुद्धा तुम्ही घरी आणली नाहीत.’
बाबा हसूनच म्हणाले, अगं शमू, कसं आणणार मी घरात कलिंगड? तुला सर्दी पडसं किती दिवस होतं ते ठाऊक आहे ना.’ शमी म्हणाली, “मला सारं ठाऊक आहे बरं. पण मला एक सांगा, माझ्या सर्दीचा आणि कलिंगडाचा काही तरी संबंध आहे का? का ऊठसूट वडाची साल पिंपळाला चिटकवायची.’ बाबा हसून म्हणाले, “अगं आज्जीबाई, सर्दी असल्यावर कलिंगड खाऊ नये म्हणतात. कारण कलिंगड शरीरासाठी थंड असते.’ शमी म्हणाली, “असं आहे होय. मला कुठलं हे बापडीला माहीत असणार.’ आई लगेच म्हणाली, “शमू, ऋतूचक्रातील प्रत्येक ऋतू आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. तसंच प्रत्येक ऋतूत येणारी विविध फळं, हीसुद्धा आपल्यासाठी उपकारकच असतात बरं. ती आपण खाल्ली पाहिजे. कारण प्रत्येक फळात आपल्या शरीराला उपयोगी पडणारे पोषक घटक असतात.’
बाबा लगेच म्हणाले, अगदी बरोबर. जसे की डाळींब हे फळ बाळूला खूप आवडते. काय बरं आहे या डाळिंबाचे वैशिष्ट्ये? मी सांगतो तुम्हाला. ऐक हा…
लाल आणि पांढुरके डाळिंबाचे दाणे,
बाळूचे आहे खास आवडीचे खाणे,
आरोग्याची काळजी आहे या फळाला,
“हृदयाचा मित्र’ म्हणतात डाळिंबाला,
माणकासारख्या दाण्यांनी आतून भरलेले
सालीतही औषधी गुण छान उतरले,
गुणकारी, चविष्ट हे फळ रसदार
आरोग्याची आपल्या काळजी घेई फार!
बाळू म्हणाला, “बाबा, तुम्ही तर अगदी माझ्या मनातलंच बोललात.’ शमी लगेच म्हणाली, “डाळिंबाच्या दाण्यांचं ठीक आहे, पण त्याच्या सालीचा काय उपयोग?’ बाबा म्हणाले, “शमू, डाळींब हे आरोग्यदायी फळ असल्याने आजारी माणसांसाठी फार उपयुक्त ठरते. डाळिंबाच्या सालीचा काढा करून त्यात तिळाचे तेल घालून तीन दिवसांपर्यंत तो काढा प्यायल्याने पोटातील जंत निघून जातात.’
शमी म्हणाली, अच्छा, अच्छा असं आहे होय. बाबा, माझं आवडतं फळ कलिंगडही असंच भारी आहे बरं का. सर्दीत खाऊ नये, हे नव्हतं माहीत मला. पण त्याच्या बद्दलची इतर वैशिष्ट्ये मलाही ठाऊक आहे. वाचलंय मी पेपरात. ऐका हा…
उन्हाळ्यात हमखास भेटीला येते,
खाईल त्याला थंडावा देते,
तहानलेल्यांची भागवते तहान,
थकवा जाऊन पोट भरते छान,
टरबूज, खरबूज, याचेच जोडीदार,
याच्या आत मात्र, काळ्या बिया फार,
वरून हिरवा आणि लालेलाल आत
आरोग्याला याचीसुद्धा मिळते साथ,
आई म्हणाली, “मस्तच गं शमू. मला कुठलं फळ खूप आवडतं माहितीय, पपई. मला खूपच आवडते पपई. ही पपईसुद्धा फार गुणाची बरं का…
एरंडाच्या पानांसारखी, तिची पानं असतात
मिऱ्यासारख्या काळ्या बिया, तिच्या आत बसतात
लहानमोठ्या आकारात पिवळ्याधमक दिसतात,
पिकल्यावर साखरेसारख्या गोड गोड हसतात,
पोटाच्या विकारांना दूर सदा ठेवतात,
भूक आणि शक्ती आपली वाढवतात,
अशी ही पपई आहे फार गुणाची
म्हणूनच आहारात नियमित खायची!
बाबा म्हणाले, “कावेरी, छानच सांगितलंस गं. बाळू, शमू, तुम्ही सर्वांनी तुमच्या आवडत्या फळाबद्दल सांगितलंत. माझं आवडतं फळ आहे आंबा. म्हणतात ना…
कच्च्याची लागते, आंबट फोड
पिकल्यावर होतो हा, मधुर गोड
कच्च्याचे लोणचे, लागे चवदार
पिकल्यावर आंबापोळी, रुचकर फार
कोकणातला हापूस, जेव्हा येतो घरी
हवीहवाशी त्याची वाटे, चव जिभेवरी
रस याचा पिऊन, एकदा तरी पाहा
फळांचा राजा, आंबाच हा
व्वा! बाबा, छानच हा. बाळू उत्साहाने म्हणाला. आता बाळूने कवितेला सुरुवात केली. कवितेचं नाव आहे, “आई-बाबा सांगतात’
आई-बाबा सांगतात, रोज फळे खा
फळे खाऊन पोरांनो धष्टपुष्ट व्हा!
रत्नागिरीचा हापूस आंबा रसासाठी पिळू,
वसई, जळगावच्या केळींचे शिकरण चला करू,
डहाणू, घोलवडच्या चिकूंचा, मिल्कशेक पिऊ,
नागपूरची संत्री मिळून सारे खाऊ,
राजेवाडीचे अंजीर स्वादिष्ट फार,
श्रीरामपूरची मोसंबी गोड रसदार,
अलिबागची कलिंगडे देतात थंडावा,
दौलताबादची सीताफळे गोडीला जणू खवा,
मेहरूणच्या बोरांची चवच आहे न्यारी,
नाशिकच्या द्राक्षांची पेटीच आणू घरी,
महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी लागे मस्त मस्त,
मालवणचे काजू तर खायला जबरदस्त,
फळे देती आम्हा आरोग्य आणि शक्ती,
फळांसारखेच आई-बाबा गोड गोड किती!
एकनाथ आव्हाड





