रूपगंध : ई होम

आजकालची घरं ही इको फ्रेंडली तर असतातच शिवाय ती नव्या सुविधांनी पर्याप्त असतात. त्यातल्या सुरक्षा साधनांपासून ते इंटेरिअरपर्यंत अनेक गोष्टी नेक्स्ट जनरेशनला शोभेशा असायला हव्यात. वेळेची आणि श्रमाची बचत हे त्यामागचं मुख्य कारण आहे तर सुरक्षा आणि मानसिक समाधान यांनाही ही ई होम्स सपोर्ट करतात. काय कल्पना
आहे यांची?
समताच्या ऑफिसमध्ये आज महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं आणि तिचा फोन खणखणला. पाहते तर सोसायटीच्या ऑफिसमधून फोन. आता काय झालं म्हणून तिने फोन घेतला तेव्हा कळलं की सकाळी बाहेर पडताना ती बेडरूमचा एसी बंद करायची विसरली होती आणि हे वॉचमनच्या लक्षात आल्याने त्याने सोसायटीच्या ऑफिसला तसं कळवलं होतं. आता दिवसभर एसी सुरू राहील हा एक भाग; पण परत घरी जाणंही शक्य नव्हतं. कारण, मिटींगची वेळ जवळ येत होती. तिने तिच्या नवऱ्याला फोन केला आणि त्याने तिला शांतपणे मिटींगला जायचा सल्ला दिला. तोही आपल्या कामात मग्न होता. पण त्याने टॅबमधून एक सेटिंग चेक केलं आणि एसी बंद करायच्या सूचना दिल्या. काहीवेळाने फोन करून त्याने एसी बंद झाल्याची खात्री सोसायटीच्या ऑफिसमध्ये फोन करून घेतली.
कुणीही घरी न जाता एका सेटिंगमधून हे कसं शक्य झालं याला उत्तर “ई होम’ असं आहे. आता घराच्या बाहेर असतानाही घरातल्या काही गोष्टी तुम्ही रिमोटद्वारे बदलू शकता. अर्थात, त्यासाठी घरात तशा सोयी हव्यात. इंटेलिजंट बिलिंडग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर जर तुमच्या घरात कार्यरत असेल तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी करणं सोडून द्यायला हवं.
सकाळच्या गडबडीत घरातली एखादी गोष्ट बंद करून बाहेर पडायची विसरते असं बऱ्याचवेळा घडतं. त्यामुळे दिवसभर त्या गोष्टीची चिंता मनात राहते. कधी गॅस चालू राहिला का? हिटर बंद केला की नाही? लॅच लावलं की नाही? घरातले दिवे तर चालू राहिले नाहीत ना? अशा कितीतरी गोष्टी घरातून बाहेर पडल्यावर भुंग्यासारख्या मनात भिरभिरत राहतात. त्यातून कधी अपघात घडण्याची शक्यताही असते. केवळ तुमच्याच नाही तर इतरांच्या घराच्या सुरक्षेलाही त्यातून धोका निर्माण होत असतो म्हणूनच घरातल्या गोष्टी फार काळजीपूर्वक बंद कराव्या लागतात.
मात्र, आता “ई होम’ च्या सुविधेने ही चिंता करायचं कारण नाही. कारण, या सॉफ्टवेअरमधून तुम्ही घराच्या बाहेर असला तरी तुम्हाला या गोष्टी ऑपरेट करता येणार आहेत. हे काम अगदी रिमोट कंट्रोलसारखंच चालतं. गाडीचं लॉक जसं तुम्ही काही मीटर अंतरावरून ऑपरेट करता तसाच काहीसा हा प्रकार पण थोडा जास्त ऍडव्हान्स. परदेशात अशा घरांची संकल्पना लोकप्रिय झाल्यावर आपल्याकडेही ती अंमलात आणली जात आहे. अशा सिस्टिमवर आधारित घरांची रचना सुरूही झाली आहे. त्यात नक्की कोणत्या सुविधा मिळू शकतात? त्या कशा वापरायच्या? त्या बंद झाल्या तर काय आणि त्यासाठी किती जास्त खर्च येईल असे अनेक प्रश्न तुमच्या मनात पडले असतील तर या ई होम प्रणालीबद्दल थोडं जाणून घेऊया.
घरातल्या काही गोष्टी बाहेर राहूनही तुम्ही ऑपरेट करू शकला तर किती मजा येईल नाही? समजा, घरातली एखादी खिडकी उघडून तुम्ही घरी जाईपर्यंत घरात नैसर्गिक वारं खेळतं राहावं असं वाटलं किंवा घरात गेल्यावर लगेच गरम पाण्याने आंघोळ करायची लहर आली आणि तुम्ही घरी पोहपचेपर्यंत वॉटर हिटर ऑन होऊन पाणी गरम होऊन राहिलं तर? मायक्रो ऑन होऊन आतमध्ये ठेवलेला चहा तयार झाला तर? किंवा तुमच्या आवडीचा कार्यक्रम सुरू असताना तुम्ही घराबाहेर आहात तर तो रेकॉर्ड करता आला तर? अशा कितीतरी गोष्टी “ई होम’ मध्ये सहज शक्य होतील.
टॅबलेट किंवा मोबाइलमध्ये असे एक सॉफ्टवेअर घालून तुम्ही या सगळ्या गोष्टी ऑपरेट करू शकता. त्यात एखादं इलेक्ट्रॉनिक उपकरण बंद किंवा सुरू करण्यापासून ते घरातल्या दिव्यांचा प्रखरपणाही कमी जास्त करण्याची सोय असेल. घरात कोणताही अपघात घडला तर पोलीस किंवा अग्निशमन दलाला फोन जाण्याची सोय असेल. घरफोडी झाली तर अलार्म वाजण्यापासून ते पोलिसांना सूचना दिली जाण्याची सोय असेल. हे सगळं तुम्ही लॅपटॉप, मोबाइल, टॅब किंवा आयपॅडवरून ऑपरेट करू शकता. त्यामुळे ते वापरणं सोपंही आहे.
अर्थातच या सुविधा करून घेण्यासाठी सामान्य इंटेरिअरपेक्षा थोडा जास्त खर्च येणार यात शंका नाही. शिवाय या सुविधा ज्या प्रकारच्या घरात दिल्या जातील ती बजेट किंवा अफोर्डेबल हाउसिंग सोसायटीत मोडणार नाहीत हेही उघडच आहे. पण तंत्रज्ञान ज्या पद्धतीने सामान्य माणसाच्या आवाक्यात येत आहे ते पाहता येत्या काही वर्षांत या सुविधा सामान्यांसाठीही उपलब्ध होतील यात शंका नाही.
मात्र, या गोष्टी वापरायला जितक्या सोप्या तितकीच त्यांची देखभालही गरजेची आहे. या सुविधा इंटरनेटच्या वायफाय पद्धतीने चालत असल्याने ती सोय उत्तम असावी लागणार आहे. ही उपकरणे महाग असल्याने ती काळजीपूर्वक वापरावी लागतील. मुलांपासून या गोष्टी लांब ठेवणं कधीही श्रेयस्कर. कारण, उत्सुकतेपोटी त्यांनी त्याच्याशी खेळ केला तर काही उपद्व्यापही होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या काही गोष्टींची काळजी घेतली तर मात्र “ई होम’ ही येणाऱ्या आधुनिक घरांची सुरुवात असेल, असं म्हणायला हरकत नाही.
– सुचित्रा दिवाकर





