नवी दिल्ली – सीबीआयने मंगळवारी गुन्हा दाखल करून तिहेरी रेल्वे अपघात प्रकरणी तपास सुरू केला. तपासाचा भाग म्हणून सीबीआयच्या 6 अधिकाऱ्यांचे पथक ओडिशातील अपघातस्थळी पोहचले. पथकाने तिथे पाहणी केली. आता रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचे समजते.
अपघातानंतरच्या प्राथमिक चौकशीतून इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये हस्तक्षेप करण्यात आल्याची शक्यता पुढे आली. त्यामुळे अपघातामागे घातपात असण्याचा संशय बळावला. त्यातून अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रेल्वे अपघातांशी संबंधित तपासाचा अनुभव सीबीआयला नाही.
त्यामुळे त्या यंत्रणेकडून रेल्वे सुरक्षा आणि न्यायवैद्यक तज्ञांची मदत घेतली जाऊ शकते. दरम्यान, ओडिशा सरकारने मंगळवारी रेल्वे अपघातातील मृतांची सुधारित आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, अपघातात 288 जण मृत्युमुखी पडले.