Odisha Bus Accident । ओडिसातील जाजपूर जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. पश्चिम बंगालमधील कोलकात्याला जाणारी बस जाजपूर जिल्ह्यात उड्डाणपुलावरून खाली कोसळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात एका महिलेसह किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ४० जण जखमी झाले आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग-16 वरील बाराबती पुलावर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास 50 प्रवाशांसह ही बस पुरीहून कोलकात्याच्या दिशेने जात होती त्यावेळी हा अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर ४० जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
ओडिशा बस अपघात कसा झाला? Odisha Bus Accident ।
धर्मशाला पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक तपन कुमार नाईक म्हणाले, “दुर्घटनेत चार पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सुमारे 40 जण जखमी झाले असून त्यापैकी 30 जणांना कटक एससीबी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, पुरीहून कोलकात्याला जाणारी बस सोमवारी संध्याकाळी बाराबती पुलावरून खाली पडली. हा अपघात कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतीची घोषणा Odisha Bus Accident ।
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची एक्स-ग्रॅशिया रक्कम जाहीर केली. जखमींबाबत सध्या कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.