पुणे जिल्हा: ओढे, तलाव ओव्हर फ्लो

निमसाखर – घोरपडवाडी (ता. इंदापूर) येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले ओव्हर फ्लो झाले आहेत. त्यामुळे मका, बाजरी व ऊस पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

सोमवारी (दि. 14) रात्रीपासून इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा तडाखा घोरपडवाडीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. रात्रभर पाऊस झाल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे येथील रहिवाशांच्या घरात पाणी गेल्याने जीवनावश्‍यक वस्तूंचे ही नुकसान झाले आहे. घोरपडवाडी-सराफवाडी या रस्त्यावर घोरपडवाडी येथील गावतळे क्रमांक 1 येथील ओढ्यामध्ये लहान नळ्या टाकल्या आहेत.

यामुळे पाणी लोकांच्या घरात जात आहे. या पावसामुळे विठ्ठल मचाले, दादा सिताप यांच्या घरात पाणी गेले आहे. या ओढ्यामध्ये टाकलेल्या लहान नळ्यांमुळे ओढ्याचे पाणी गावामध्ये शिरले आहे. घोरपडवाडीतीले गाव तळ्यात काही युवकांनी मत्स्य व्यवसाय करण्यासाठी हे तळे घेतले होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच सुमारे एक लाख रुपयांचे मत्स्यबिज या तळ्यामध्ये सोडले होते. मात्र मुसळधार पावसामुळे हे तळे ओसंडून वाहू लागल्याने तळ्यामध्ये सोडलेले मत्स्यबिज वाहून गेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.