‘अन्न खरेदीनंतर पावती बंधनकारक, अन्यथा खाणे मोफत’

पुणे – स्थानकाच्या परिसरामधील सर्व अधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी प्रवाशांना अन्न खरेदीनंतर पावती देणे अनिवार्य असल्याची घोषणा नुकतीच रेल्वेमंत्र्यांनी केली. यानुसार “नो-बिल-नो पेमेंट’ असा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. विक्रेत्यांनी प्रवाशांना पावती न दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

या घोषणेनुसार रेल्वेचे वाणिज्य विभागातील कर्मचारी, केटरिंग निरीक्षकांकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. स्थानक परिसरमध्ये दुकाने आणि स्टॉल्सची यामध्ये पाहणी करण्यात येणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

पुणे विभागामध्ये देखील याबाबतचे अर्थात “बिल न दिल्यास प्रवाशांना मोफत खाणे मिळेल’, असे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. पुणे विभागातील सर्व स्थानकांवर नो बिल, फ्री फूड बाबतची उद्‌घोषणा करण्यात येत असून प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.