बांधकामास अडथळा; तिघांस मारहाण 

शिंगवे नाईक येथील प्रकार : एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर – वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भिंत बांधण्यास हरकत अडथळा आणल्याच्या कारणावरून तिघांनी लोखंडी पहार, कोयत्याने बेदम मारहाण केल्याची घटना नगर तालुक्‍यातील शिंगवे नाईक शिवारातील काळेवस्तीजवळ घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात लक्ष्मण किसन काळे (रा.शिंगवे नाईक) यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब यशवंत काळे, गणेश बाळासाहेब काळे, अमोल बाळासाहेब काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, लक्ष्मण काळे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाळासाहेब यशवंत काळे, गणेश बाळासाहेब काळे, अमोल बाळासाहेब काळे (सर्व रा. शिंगवे नाईक) हे रस्त्यावर भिंत बांधत असताना लक्ष्मण काळे यांनी तुम्ही येथे भिंत बांधू नका असे म्हणून, त्यांच्या बांधकामात अडथळा आणला. याचा राग आल्याने तिघांनी त्यांना लोखंडी पहारीने मारहाण करून हात फॅक्‍चर केला. तसेच लक्ष्मण काळे यांच्या वडिलांना कोयत्याने मारहाण केली. आणि मुलगा अरूण यास लाथाबुक्‍यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत लक्ष्मण काळे, किसन काळे व अरूण काळे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी लक्ष्मण काळे यांच्या फिर्यादीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहायक फौजदार जयवंत दळवी हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.