पुणे –पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचे काम जोरात सुरू झालेले असताना खेड तालुक्यात या प्रकल्पाच्या कामाला संरक्षण विभागाकडून आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी काम थांबविण्यात आले आहे. खेड तालुक्यात लष्कराच्या जागेतून हा प्रकल्प जात असल्याने याकामावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी गावांतील जागा संपादित करण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
“महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.’ मार्फत पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. हा मार्ग पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून प्रस्तावित आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांत मिळून एकूण 54 गावांतून हा मार्ग प्रस्तावित आहे.
पुणे स्थानकासह हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या स्थानकांचाही यामध्ये समावेश आहे. प्रमुख स्थानकांपैकी चाकण, मंचर तसेच नारायणगाव ही स्थानके कृषी उत्पादन व खासगी मालवाहतूक टर्मिनल असणार आहेत. राजगुरूनगर स्थानक हे फक्त प्रवासी रहदारीसाठी असणार आहे. या प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. मात्र, संरक्षण विभागाकडून खेड तालुक्यातील कामाला आक्षेप घेण्यात आल्याने सध्या काम थांबविण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील कामाला संरक्षण विभागाने आक्षेप घेतला आहे. खेड तालुक्यात लष्कराचे स्फोटक नष्ट करण्याचे केंद्र आहे. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे त्याला अडथळा येत असल्याने आक्षेप घेण्यात आल्याचे संरक्षण विभागाचे म्हणणे आहे. रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल केला त्यावेळी आक्षेप घेण्यात आला नव्हता, आता अचानक आक्षेप घेण्यात आल्याने तेथील काम थांबविले आहे.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
*पुणे जिल्ह्यातून प्रकल्पासाठी आतापर्यंत 26 खरेदीखत.
*जिल्ह्यातील 54 पैकी 40 गावांत मोजणी पूर्ण.
*रेल्वेचा वेग प्रतितास 200 कि.मी. असणार.
*18 बोगदे, 41 उड्डाणपूल, 128 भुयारी मार्ग आहेत.
*विद्युतीकरणासह एकाच वेळी दुहेरी रेल्वे मार्गाचे काम.