पुणे – करोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता, शासकीय कार्यालयांमध्ये या विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम व इतर सर्व कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांना कार्यालयीन प्रवेशद्वारापासून ते कार्यालय सोडेपर्यंतच्या कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सर्व कार्यालयांमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व अभ्यागतांनादेखील चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. अन्यथा त्यांना कार्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
करोना विषाणूचा प्रसार कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच जिल्ह्यात अधिकारी – कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये, म्हणून विविध उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.