सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहे. परंतू जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा यांना या प्रतिबंधात्मक आदेशातून वगळण्यात आले आहे. त्यानुसार अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहे.
सातारा जिल्हा स्थलसीमा हद्दीतील खाजगी रुग्णालये, मान्यता प्राप्त वैद्यकीय व्यावसायीक, औषध दुकाने व संबंधित आरोग्य विषयक खाजगी आस्थापना सर्व सोयीसुविधांसह आपल्याकडे दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी किंवा ज्या रुग्णांना वैद्यकीय सेवेची आवश्यकता आहे अशा रुग्णांसाठी सुरु ठेवणे संबंधितांवर बंधनकारक राहिल. ही कार्यवाही करताना कोरोना विषयक प्रतिबंधात्मक बाबींच्या उपाययोजना (उद. हॅन्डवॉश, सॅनिटायझर) ठेवणे बंधनकारक राहील,
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल.