मुंबई – पोटदुखीच्या त्रासामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात एन्डोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
शरद पवार यांच्या आजाराबाबत सोशल मीडियावर काही जणांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने राष्ट्रवादी काॅग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी क्राईम ब्रांचचे एसपी शिंत्रे यांची भेट घेऊन या संदर्भात तक्रार केली आहे.
‘आमचा मान, स्वाभिमान असलेल्या साहेबांवर केलेली टीका आमच्या जिव्हारी लागली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित समाजकंटकांवर कारवाई करावी’, अशी मागणी शेख यांनी केली आहे. त्यानुसार, पोलीसांकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे.
‘आतापर्यंत आम्ही सोशल मीडियावर अत्यंत संयमाने व्यक्त होत होतो आणि आहोत. मात्र, यापुढे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कोणत्याही नेत्यांवर किंवा कार्यकर्त्यांवर मर्यादा सोडून टीका केल्यास राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मेहबूब शेख यांनी दिला आहे.