पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक ओबीसी आरक्षणासह होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने 31 मे 2022 रोजी काढलेली सर्वसाधारण आरक्षण सोडत रद्द झाली आहे. त्यामुळे खुल्या गटातील जागा कमी झाल्या असून या जागांसाठी इच्छुकांमध्ये चांगलीच रस्सीखेच निर्माण होणार असल्याचे चित्र आहे.
ओबीसी आरक्षणाचा मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी फेटाळला होता. त्यामुळे राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ओबीसींशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोत, अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार बांठिया आयोगाने तयार केलेला ओबीसींचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य करून निवडणुक घेण्याची परवानगी दिली आहे. दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने शहरातील राजकीय वतुर्ळांत पुन्हा निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत महापालिका प्रशासनाने अंतिम प्रभाग रचना, एसटी, एससी आरक्षण सोडतीचे काम पूर्ण केले आहे. तसेच अंतिम मतदार याद्याही गुरूवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. ओबीसी आरक्षणाच्या निकालामुळे महापालिकेच्या निवडणूक विभागाने 31 मे 2022 रोजी काढलेली सर्वसाधारण आरक्षण सोडत रद्द झाली आहे.
महापालिकेत 139 सदस्य संख्या असून यामध्ये 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी (एससी) 22 जागा राखीव आहेत. त्यात 19, 41, 20, 18, 37, 43, 34, 24, 35, 11, 14 या प्रभागात महिलांसाठी 11 जागा राखीव झाल्या आहेत. तर, 2, 16, 17, 18, 22, 25, 29, 32, 37, 38, 39, 44, 46 या 11 जागा एससी पुरुषासांठी राखीव आहेत. तर, अनुसूचित जमाती (एसटी) महिलांसाठी 44, 41 राखीव झाली आहे. तर, प्रभाग क्रमांक 6 मधून एसटी समाजातील पुरुष, महिलेला लढता येईल. 114 जागांमधून सर्वसाधारणसाठी 76 जागा ठेवून ओबीसींसाठी 38 जागा राहतील. यातील निम्या जागा महिला आणि निम्या जागा पुरुषांसाठी राहतील. पुन्हा महिलांचे आरक्षण काढले जाईल. त्यामुळे खुल्या गटातील घटलेल्या जागेवर उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची तारेवरची कसरत होणार आहे.
अनेकांच्या सौभाग्यवतींचीही तयारी
ओबीसीच्या निकालामुळे महापालिका निवडणुकीची सर्व समीकरणे बदलणार आहेत. आता 114 जागांमधून सर्वसाधारण गटासाठी 76 जागा ठेवण्यात येणार आहेत. तर 38 जागा ओबीसीसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. या सर्व जागांवर नव्याने महिलांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. मात्र, असे असले तरी अनेकांनी “अभी नही तो कभी नही” याप्रमाणे स्वतःसह सौभाग्यवतींसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पती-पत्नी असे दोघांचेही फोटो, बॅनर, सोशल मिडियावर वापरून प्रभागात विविध कार्यक्रम हाती घेतले जात आहेत.