ख्राईस्टचर्च – कर्णधार केन विल्यमसनच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 3 बाद 286 धावा केल्या आहेत. पाकिस्तानने पहिल्या डावात 297 धावा केल्या असून यजमान न्यूझीलंड अद्याप 11 धावांनी पिछाडीवर आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या काएल जेमिसनसह सर्व गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करत पाकिस्तानचा डाव 297 धावांवर संपुष्टात आणला. पाकिस्तानकडून अझर अली, महंमद रीझवान, फहिम अश्रफ व जफर गोहर यांनी भक्कम फलंदाजी केली. मात्र, ते बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांना त्रिशतकी पल्ला पार करता आला नाही. अझर अलीचे शतक केवळ 7 धावांनी हुकले.
न्यूझीलंडच्या डावाची सुरुवातही खराब झाली. त्यांचे तीन फलंदाज बाद झाले तेव्हा त्यांच्या संघाची धावसंख्या 73 अशी बिकट होती. त्यानंतर मात्र, कर्णधार विल्यमसन व हेनरी निकोल्स यांनी डाव सावरला. या जोडीने पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना करताना चौथ्या गड्यासाठी 215 धावांची अखंडित भागीदारी केली. कर्णधार विल्यमसनने दमदार शतकी खेळी केली. तो 112 धावांवर खेळत आहे. त्याला सुरेख साथ देताना निकोल्सने नाबाद 89 धावांची खेळी केली असून त्यालाही शतक पूर्ण करण्याची संधी आहे. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी, महंमद अब्बास व फहिम अश्रफ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – पाकिस्तान पहिला डाव – 297. न्यूझीलंड पहिला डाव – 85 षटकांत 3 बाद 286 धावा. (टॉम लॅथम 33, केन विल्यमसन खेळत आहे 112, हेनरी निकोल्स खेळत आहे 89, महंमद अब्बास 1-37, शाहिन आफ्रिदी 1-45, फहिम अश्रफ 1-55).