ऑकलंड – बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलला संघात स्थान न मिळाल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने 10 बळी घेऊन इतिहास रचला होता.
फॉर्ममध्ये असलेल्या एजाज पटेलला संघातून बाहेर ठेवल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या निर्णयामुळे न्यूझीलंडच्या निवड समितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच न्यूझीलंडच्या संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी एजाज फिट नसल्याने त्याला बाहेर ठेवल्याचे सांगितले आहे. केन विलियमसन देखील या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाचा हिस्सा नसणार आहे.
एजाजला संघातून वगळण्याच्या निर्णयावर गॅरी स्टीडने म्हणाले, भारतात इतिहास रचणाऱ्या एजाजसाठी सर्वांना वाईट वाटते आहे. मात्र संघाच्या गरजेनुसार खेळाडूंची निवड केली जाते. ज्या खेळाडूंची बांगलादेशविरूध्दच्या मालिकेसाठी निवड झाली आहे, ते संघात फिट असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 1 जानेवारी 2022 पासून खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडने टॉम लॅथम पुन्हा एकदा संघाचे नेतृत्त्व सोपविले आहे.