प्रभात वृत्तसेवा – न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला वनडे शनिवारी (20 मार्च) पार पडला. हा सामना न्यूझीलंडने 8 विकेट्सने जिंकला. बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करताना 41.5 षटकांत सर्वबाद 131 धावसंख्येवर आटोपला. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंड संघाने हे आव्हान 21.2 षटकांत 2 बाद 132 धावा करत जिंकला. ट्रेंट बोल्टने या सामन्यात भेदक गोलंदाजी करताना (4/27) विजयात मोलाची भूमिका बजावली.
तत्पूर्वी न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जो पूर्णपणे योग्य ठरला. बांग्लादेश संघाच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. तमिमने 13(15) धावा करताना पहिल्या गड्याच्या रूपाने बाद झाला. त्यानंतर संघाच्या 78 धावा पर्यंत बांग्लादेशचा निम्म्या पेक्षा जास्त संघ तंबूत परतला. बांग्लादेश संघाकडून सर्वाधिक धावा महमदुल्लाहने केल्या.
त्याने 54 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार लगावत 27 धावा केल्या. रहीमने 23(49) धावा केल्या. तसेच इतर कोणत्याही फलंदाजाला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे बांग्लादेशने 41.5 षटकांत सर्वबाद 131 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सर्वाधिक 4 विकेट्स ट्रेंट बोल्टने घेतल्या. त्याचबरोबर निशम आणि सँटनरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच हेन्रीने 1 विकेट्स घेतली.
न्यूझीलंड संघाला विजयासाठी 132 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टील हा संघाचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर पहिल्या गड्याच्या रूपाने बाद झाला. त्याने 38(19) धावांचे योगदान दिले. त्यानंतर कॉन्वे 27(52) धावा करून बाद झाला. न्यूझीलंड कडून सर्वाधिक धावा हेन्री निकोलसने केल्या. त्याने 53 चेंडूत 6 चौकार लगावत नाबाद 49 धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर विल यंगने नाबाद 11(6) धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंड संघाने 21.2 षटकात 2 गडी गमावून 132 धावा करत विजय मिळवला. बांग्लादेश कडून तस्कीन अहमद आणि हसन महमूद यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.
त्यामुळे न्यूझीलंड संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर या सामन्यात दमदार गोलंदाजी करणार्या ट्रेंट बोल्टला सामनावीर पुरस्कार देवून गौरविण्यात आले.