नगर – शहरात बेकायदेशीरपणे विक्री केल्या जात असलेल्या नायलॉन (चायना) मांजावर शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नायलॉन (चायना) मांजा जप्त करत 14 जणांवर गुन्हे नोंदविले. कोतवाली पोलीस ठाण्यात पाच तर तोफखाना पोलीस ठाण्यात नऊ, असे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने रविवारी रात्री बागडपट्टी परिसरात ही कारवाई केली.
मकरसक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक दुकानामध्ये कायद्याने बंदी असलेल्या नायलॉन (चायना) मांजाची खुलेआम विक्री होत असल्याची माहिती उपाधीक्षक मिटके यांना मिळाली होती. बेकायदेशीर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना पोलिसांनी नोटीस काढून विक्री करण्यास मनाई केली होती. या मांजामुळे नागरिक, पशूपक्षी यांच्या जिवीताला धोका निर्माण होऊन अनेक पशूपक्षांचा बळी गेला आहे. तर, अनेकांच्या गळ्याभोवती मांजाची दोर गुडांळून जखमी झाले आहे. नायलॉन मांजामुळे जखमी झाल्याच्या तक्रारी यापूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहे.