पुणे – शाळेतच शिजणार पोषण आहार

पुणे – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत राज्यातील शाळांना स्वयंपाकगृह उपकरण संच उपलब्ध करून देण्यात येणार असून यामुळे शाळांना दिलासा मिळणार आहे. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळा स्तरावर धान्य साठवणूक आहार शिजवणे, शिजवलेला आहार साठवणूक करणे आणि विद्यार्थ्यांना आहार घेणे व वाटपासाठीची उपकरणे उपलब्ध करून देण्याकरीता केंद्र शासनाने 2019-20 मध्ये निधी उपलब्ध करून दिला होता.
या निधीमधून शाळांना धान्य साठविण्याच्या कोठ्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. उर्वरित निधीतून 2020-21 मध्ये शाळांना स्वयंपाकगृह उपकरणाचा संच पुरवठा करण्याकरीता ई-निविदा प्रक्रियेद्वारे मुंबईतील रेड कॉर्पोरेशन या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
ज्या शाळांना धान्य साठविण्याच्या कोठ्या पुरवठा करण्यात आल्या होत्या, अशा शाळा वगळून उर्वरित शाळांना प्रथम प्राधान्याने स्वयंपाकगृह उपकरणाचा संच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पुरवठादारामार्फत शाळास्तरावर स्वयंपाकगृह उपकरण संचाचा पुरवठा केला जाणार आहे. शाळास्तरावर स्वयंपाकगृह उपकरण संच प्राप्त होताच संचामध्ये आवश्यक ते सर्व साहित्य असल्याची खात्री करून पोहोच पावतीवर साहित्य प्राप्त झाल्याचा दिनांकासह स्वाक्षरी करून त्यावर नाव व पदनाम नमूद करणेबाबत संबंधित शाळांना स्तरावरून सूचना देण्यात याव्यात, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी, बृह्न्मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.
शाळास्तरावर साहित्य स्वीकारते वेळी साहित्य खराब आढळून आल्यास त्याची नोंद पोहोच पावतीवर घेऊन साहित्य तत्काळ बदलून देण्याबाबत पुरवठादारास सूचित करावे लागणार आहे. प्राप्त झालेल्या स्वयंपाकगृह उपकरण संचाची नोंद शाळेच्या साठा नोंदवहीमध्ये अचूक स्वरूपात करण्यात यावी.
स्टेनलेस स्टील टाकी, खिचडीपात्र, डब्बा, भातवाडी, चमचा, भोजनपात्र आदी साहित्याचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपकरणांचा योजनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी वापर केला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. उपकरणे सुस्थितीमध्ये ठेवून योजनेअंतर्गत आहार वाटप व आहाराच्या सेवनाकरीता नियमितपणे वापर करण्यात यावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळा बंदमुळे रेंगाळली होती योजना…
करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद असल्यामुळे स्वयंपाकगृह उपकरण संचाचा पुरवठा सुरू करण्याची योजना रेंगाळली होती. सद्यस्थितीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव बहुतांश जिल्ह्यामध्ये नियंत्रणामध्ये आलेला आहे. चालू शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरूही करण्यात आलेले आहे. त्यामुळे शाळा स्तरावर स्वयंपाकगृह उपकरण संचाचा पुरवठा करणे शक्य असल्याने पुरवठा सुरू करण्यात येत आहे.





