विविधा: नूतन बहल

माधव विद्वांस

आपले सात्विक व्यक्‍तिमत्त्व व अभिनयामुळे प्रेक्षकांना आपलेसे करणाऱ्या नूतन बहल यांची आज जयंती. त्यांचा जन्म एका मराठी कुटुंबात 4 जून 1936 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव नूतन समर्थ. त्यांचे वडील कुमारसेन निर्माते, दिग्दर्शक तर आई शोभना अभिनेत्री. त्यांना अभिनेत्री तनुजा व चतुरा आणि भाऊ जयदीप अशी भावंडे होती.

नूतन यांनी 9व्या वर्षी बालकलाकार म्हणून कुमार समर्थ यांच्या नलदमयंती चित्रपटात काम केले होते. अखिल भारतीय सौंदर्य स्पर्धेत त्यांना पहिला क्रमांक मिळाला होता; पण त्यावेळी चित्रपटसृष्टीचे त्यांच्याकडे लक्ष गेले नव्हते. वर्ष 1950 मध्ये त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षीच “हमारी बेटी’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांची आई शोभना यांनीच केले होते. त्यांचे शिक्षण पाचगणी येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले. त्यांच्या आईने स्वित्झर्लंडच्या शाळेत पुढील शिक्षणासाठी त्यांना पाठविले होते. 11 ऑक्‍टोबर 1959 रोजी लेफ्टनंट कमांडर रजनीश बहलशी विवाह केला. त्यानंतर मोहनिशचा जन्म 14 ऑगस्ट 1961 रोजी झाला व त्यांनी काही काळासाठी विश्रांती घेतली. त्यांचे नगिना, हमलोग हे चित्रपट वर्ष 1951 दरम्यान प्रदर्शित झाले. वर्ष 1955 मधे सीमा या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट नायिकेचे फिल्मफेअर ऍवार्ड मिळाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. वर्ष 1958 मध्ये प्रदर्शित झालेल्या “दिल्ली का ठग’ या चित्रपटात त्यांनी स्वीमिंग ड्रेस घातला होता.

त्यांना एकूण 6 वेळा सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाले. 1960 मध्ये सुजाता, 1964 मध्ये बंदिनी, 1968 मध्ये मिलन, 1979 मध्ये मैं तुलसी तेरे आँगन की साठी सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्री, 1986 मध्ये “मेरी जंग’साठी फिल्म फेअर ऍवार्ड मिळाले. नूतन यांनी 1970 च्या दशकापर्यंत चित्रपटसृष्टी नायिका म्हणून गाजविली. अशोककुमार, दिलीपकुमार, रेहमान, बलराज सहानी, प्रदीपकुमार, किशोरकुमार, मनोजकुमार, राजकपूर, सुनीलदत्त, देवानंद, अमिताभ बच्चन अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर त्यांनी भूमिका केल्या. वर्ष 1963 मधे नूतन यांचा अशोककुमार आणि धर्मेंद्र यांच्याबरोबरचा “बंदिनी’ हा दिग्दर्शक निर्माते बिमल रॉय यांचा चित्रपट कमालीचा गाजला. चारू चंद्र चक्रवर्ती यांच्या “तामसी’ या बंगाली कादंबरीवर आधारित एका महिला कैद्याच्या जीवनावरील या चित्रपटाने त्यावर्षी 6 पुरस्कार जिंकले.

वर्ष 1968 मध्ये प्रदर्शित झालेला “सरस्वतीचंद्र’ हा चित्रपट नूतनचा अभिनय आणि त्यातील गाणी यांच्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. हा चित्रपट कृष्णधवल चित्रपटातील शेवटचा हिंदी चित्रपट होता. गोवर्धनदास त्रिपाठी यांच्या कथेवर आधारित या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटासाठी आणि उत्कृष्ट संगीतासाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला. 1967 मध्ये प्रदर्शित झालेला “मिलन’ हा चित्रपटही त्यांच्या अभिनयाने गाजला. भारत सरकारने त्यांना वर्ष 1974 मधे पद्मश्री देऊन सन्मानित केले. त्यांचे कर्करोगाने 21 फेब्रुवारी 1991 रोजी मुंबई येथे निधन झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.