धनबाद – झारखंडमधील धनबादमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एका खासगी नर्सिंग होमला आग लागली. या आगीत दोन डॉक्टरांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृतांमध्ये वैद्यकीय आस्थापनाचे मालक डॉ. विकास हाजरा, त्यांची पत्नी डॉ. प्रेमा हाजरा, मालकाचा पुतण्या सोहन खमारी आणि घरातील नोकर तारा देवी यांचा समावेश आहे.
रांचीपासून सुमारे 170 किमी अंतरावर असलेल्या धनबादच्या बॅंक मोड भागात असलेल्या नर्सिंग होमच्या स्टोअर रूममध्ये पहाटे 2 वाजता आग लागली. धनबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, “स्टोअर रूममध्ये आग लागल्याने नर्सिंग होमचे मालक आणि त्यांच्या पत्नीसह किमान पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या आगीत एक जण जखमी झाला आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृतांपैकी चार जणांची ओळख पटली आहे, तर पाचव्याची ओळख अद्याप पटलेली नाही.