परिचारिकांचा संप : 90 रुग्णांचा जीव टांगणीला

  • पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील नवीन कोविड रुग्णालयातील प्रकार

पिंपरी – कमी पगार आणि तो देखील वेळेवर मिळत नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयातील परिचारिका मंगळवारी (दि. 4) सकाळी अचानक संपावर गेल्या. यामुळे रुग्णालयातील 90 करोना बाधित रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

भोसरी येथील नवीन कोविड रुग्णालयात 60 पुरूष आणि 30 महिला उपचार घेत आहे. या रुग्णालयात आठ परिचारिकांना आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करतात. मात्र येथील परिचारिकांना कमी वेतन मिळत असून, प्रत्येक महिन्याला वेळेवर पगार होत नसल्याचे परिचारिकांचे म्हणणे आहे. करोना बाधितांवर उपचार करण्याचे काम जोखमीचे आहे. त्यामुळे महापालिकेच्या परिचारिकांप्रमाणे आपल्याला पगार द्यावा. तसेच पगार वेळेवर मिळावा, यासाठी मंगळवारी (दि. 4) सकाळपासून या रुग्णलायातील एकही परिचारिका कामावर आल्या नाही. येथील रुग्णांपैकी काही रुग्ण ऑक्‍सिजनवर आहेत. परिचारिकांच्या संपामुळे येथील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत बोलताना महापालिकेचे प्रवक्‍ते शिरीष पोरेडी म्हणाले, या रुग्णालयातील परिचारिकांना तीन महिन्यांसाठी घेतले असून, त्यांना पगारही व्यवस्थित आहे. या महिन्याच्या पगाराचा धनादेश काढला आहे. शनिवारी आणि रविवारी सुट्टी आल्यामुळे तो बॅंकेतून त्यांच्या खात्यात जमा झालेला नव्हता.

आज मंगळवारी सकाळी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. याबाबत संबंधित परिचारिकांना सांगण्यात आले आहेत. मात्र त्या अद्यापही कामावर आलेल्या नाहीत. त्यामुळे अन्य रुग्णालयातून काही परिचारिका भोसरी येथील नवीन कोविड रुग्णालयात पाठविण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.